भारतात ज्या एफ-१६ फायटर विमानांची निर्मिती होईल त्यामध्ये काही खास वैशिष्ट्य असतील असे अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने म्हटले आहे. अमेरिकन संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या लॉकहीड मार्टिनने भारतात एफ-१६ फायटर विमानांच्या निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे भारताच्या हवाई सुरक्षेच्या गरजा पूर्ण होणार असून मेक इन इंडियाचे धोरणही प्रत्यक्षात येईल.

मेक इन इंडियामुळे संरक्षण क्षेत्राचे दरवाजे भारतीय खासगी कंपन्यांसाठी खुले झाले आहेत. हवाई दलाला अधिक मजबूत, सक्षम करण्यासाठी आपल्या ताफ्यात नव्या लढाऊ विमानांचा समावेश करण्याची भारताची योजना आहे. अब्जावधी डॉलर्सचे हे कंत्राट मिळवण्यासाठी लॉकहीड मार्टिन कॉर्प, साब एबी ग्रिपेन आणि बोईंग या कंपन्यांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे.

एफ-१६ विमान निर्मितीचा संपूर्ण प्रकल्प भारतात आणण्याची लॉकहीड मार्टिनची तयारी आहे. भारतात विमानांची निर्मिती करताना त्यात काही खास गोष्टी असतील. ज्या यापूर्वी कुठल्याही फायटर विमान निर्मिती कंपनीने दिलेल्या नाहीत असे लॉकहीड मार्टिनचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी सांगितले.

भारतीय नौदलासाठी फायटर जेट विमानांच्या पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी आघाडीवर असलेली बोईंग कंपनी आता इंडियन एअर फोर्ससाठी विमान बनवण्याची ऑर्डर मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने एअर फोर्सला दोन इंजिन असलेल्या फायटर जेट विमानांच्या खरेदीवर विचार करण्यास सांगितले आहे. तेव्हापासून १५ अब्ज डॉलरचे हे कंत्राट मिळवण्यासाठी बोईंगही जोरदार प्रयत्न करत आहे.

मागच्या महिन्यात केंद्र सरकारने एअर फोर्सला दोन इंजिन असलेल्या फायटर विमानांसाठी निविदा मागवायला सांगितल्या तसेच बोईंगच्या एफ/ए-१८ सुपर हॉरनेट विमानाचे मूल्यमापन करायला सांगितल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. भारतीय नौदलासाठी बोईंगच्या फायटर विमानांची अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती आहे. जवळपास अशी ५७ विमाने विकत घेण्यात येणार आहेत.