एफ-१६ फायटर विमान निर्मितीचा प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवणाऱ्या लॉकहीड मार्टिन कंपनीची भारतातूनच अन्य देशांना एफ-१६ विमाने निर्यात करण्याची योजना आहे. भारताला एफ-१६ प्रकल्पाचे जागतिक उत्पादन केंद्र बनवून भारतीय हवाई दलासह अन्य बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे असे लॉकहीडच्या रणनिती आणि बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी सांगितले.

भारताबाहेर अन्य देशांनी एफ-१६ च्या २०० पेक्षा जास्त विमानांसाठी मागणी नोंदवली आहे. हा सर्व व्यवहार २० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कमेचा आहे असे लाल यांनी सांगितले. एफ-१६ चा उत्पादन प्रकल्प भारतात सुरु झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाला मोठी चालना मिळू शकते. यातून हजारो रोजगार तयार होतील.

लॉकहीड मार्टिन भारताकडून सर्वात मोठे ११४ फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत आहे. त्यासाठीच त्यांनी एफ-१६ चा संपूर्ण प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवली आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी त्यांची बोईंग एफ/ए १८, साब ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि रशियन विमान कंपन्यांबरोबर स्पर्धा आहे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला ४२ स्क्वाड्रनची गरज आहे. म्हणजे ताफ्यात ७५० फायटर विमाने असणे आवश्यक आहे. १९६० च्या दशकातील रशियन बनावटीची मिग-२१ विमाने निवृत्त होत आहेत.

एफ-१६ चा प्रकल्प टेक्सास येथे असून तेथे आता पाचव्या पिढीच्या एफ-३५ विमान निर्मितीचे काम चालते. प्रस्तावित एफ-१६ प्रकल्पासाठी लॉकहीडने भारतीय भागीदार म्हणून टाटा अॅडव्हान्स सिस्टिमची निवड केली आहे.