एक लाख जीव आणि लाखोंची उपजीविका वाचविण्यात यश

आर्थिक पाहणी अहवालात दावा

कोविड-१९ आजारसाथीला सुरुवात होताच तातडीने योजलेल्या प्रतिबंधात्मक उपायामुळे एकूण रुग्णसंख्या ३७ लाखांपर्यंत मर्यादित राखता आली, लाखभर लोकांचे जीव वाचले आणि लक्षावधींच्या उपजीविकांचे रक्षण झाले. पुरेसा कालावधी न देताच अकस्मात लादल्या गेलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे विशेषत: गरीब, स्थलांतरित मजुरांना सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांमुळे केंद्र  सरकारवर होत असलेल्या टीकेला खोडून काढणारे उत्तर ‘आर्थिक पाहणी अहवाल २०२१’ने दिले आहे. दीर्घकालीन लाभ मिळविण्यासाठी अल्पकालीन वेदना सोसण्याच्या इच्छाशक्तीचे आता देशाला समर्पक फायदे दिसून येत आहेत, असे अहवालाने निरीक्षण नोंदविले आहे.

आर्थिक पाहणी अहवालाच्या, ‘शतकातून एकदाच भेडसावणाऱ्या आपत्तीदरम्यान, जीव आणि उपजीविकांचे रक्षण’ शीर्षकाच्या पहिल्याच प्रकरणात, साथीच्या आजाराला प्रारंभ होण्यापूर्वीच योजल्या गेलेल्या धाडसी आणि प्रतिबंधात्मक उपायांमधून भारत आता ‘टाळेबंदीचा लाभांश’ उपभोगत आहे, अशी अहवालाने टिप्पणी केली आहे.

म्हणूनच, सकल राष्ट्रीय उत्पादनात तात्पुरत्या घसरणीची आर्थिक निर्बंधामुळे मोजाव्या लागलेल्या किमतीच्या तुलनेत वाचविलेल्या मानवी जीवांचे मूल्य हे खूप मोठे आहे, असे पाहणी अहवाल सांगतो. टाळेबंदीची घाई केली गेली नसती तर, मे २०२० पर्यंत देशभरात एकूण रुग्णसंख्या ३० कोटींवर आणि त्यापैकी हजारोंना मृत्यूला सामोरे जावे लागले असते, असे अहवालाने नमूद केले आहे.

टाळेबंदीच्या ४० दिवसांच्या कालावधीचा विनियोग हा वैद्यकीय आणि निम-वैद्यकीय पायाभूत सोयीसुविधांच्या क्षमता विस्तारासाठी, सक्रियपणे देखरेखीसाठी, चाचण्यांच्या व्याप्तीत वाढीसाठी, बाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या छाननीसाठी, अलगीकरण सुविधांसाठी तसेच जनसामान्यांचे मुखपट्टय़ांचा वापर आणि सुरक्षित अंतराच्या नियमांसंबंधी जागरूकतेसाठी पुरेपूर केला गेला, असेही अहवालाने नमूद केले आहे.

जानेवारी २०२० मध्ये, भारतात दिवसाला प्रत्येक प्रयोगशाळेत केवळ १०० कोविड-१९ चाचण्या केल्या जात होत्या, आता वर्षभरानंतर देशभरात कार्यरत झालेल्या २,३०५ प्रयोगशाळांमधून दिवसाला १० लाख चाचण्या होत आहेत, असे अहवाल सांगतो.

जानेवारी २०२१ पर्यंत एकूण १७ कोटींहून अधिक चाचण्या देशात पूर्ण केल्या गेल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचेच प्रतिबिंब

विद्यमान २०२०-२१ सालातील उणे ७.७ टक्क्य़ांच्या ऐतिहासिक घसरणीतून, पुढील आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनात ११ टक्क्य़ांच्या जोरदार मुसंडीपर्यंत अर्थव्यवस्थेची उभारी ही भारताच्या क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील अलीकडच्या कामगिरीलाच प्रतिबिंबित करणारी असेल. सार्वकालिक नीचांकी ३६ धावांवर संपूर्ण संघ गारद होऊन, झेललेल्या मानहानीकारक पराभवातून सावरून भारतीय संघाने ही कसोटी मालिका २-१ ने जिंकली. अगदी त्याच प्रमाणे अर्थव्यवस्थेत इंग्रजी आद्याक्षर ‘व्ही’  आकाराप्रमाणे गतिमान रूपात उभारी दिसून येईल.

– कृष्णमूर्ती वेंकट सुब्रमणियन, मुख्य आर्थिक सल्लागार.