लोक जनशक्ती पक्षात फूट पाडल्याचा ठपका या पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बुधवारी जनता दल (संयुक्त) वर ठेवला. याच वेळी, आपले काका पशुपती कुमार पारस यांच्या नेतृत्वाखालील गटाने घेतलेले निर्णयही त्यांनी अमान्य करताना, पक्षाची घटना या लोकांना असा कुठलाही अधिकार देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना चिराग यांनी स्वत:चे वर्णन ‘शेर का बेटा’ असे केले. आपले वडील रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या ध्येयासाठी आपण लढा देऊ असे ठामपणे सांगितले. पक्षातील फुटीसाठी जद(यू)ला जबाबदार ठरवतानाच, या घडामोडींमध्ये भाजपच्या भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. जे काय घडले आहे, ती आपल्या पक्षाची अंतर्गत बाब असून त्यासाठी आपण इतरांना लक्ष्य करणार नाही असे ते म्हणाले.

माझे वडील जिवंत असतानाही जद(यू) आमच्या पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न करत होती. शिवाय त्या पक्षाने नेहमीच दलितांचे विभाजन करून त्यांच्या नेत्यांना दुर्बळ करण्याचे काम केले आहे, असा आरोप चिराग यांनी केला. आपल्याला लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा विरोधी गटाचा निर्णय चिराग यांनी अमान्य केला. त्यांनी घेतलेले सर्व निर्णय पक्षाच्या घटनेशी विसंगत आहेत असे सांगतानाच पदावर असलेल्या अध्यक्षाचा मृत्यू झाला किंवा त्याने राजीनामा दिला, तरच नव्या पक्षाध्यक्षाची नियुक्ती करता येते अशी तरतूद पक्षाच्या घटनेत असल्याचे त्यांनी नमूद केले.