विश्व हिंदू परिषदेच्या परिक्रमा यात्रेचे पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज गोंधळामुळे दुपारपर्यंत तहकूब करावे लागले. 
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी परिक्रमा यात्रेवरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. समाजवादी पक्षाचे सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणा देऊ लागले. त्याचवेळी भाजपचे सदस्य योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर सदस्य परिक्रमा यात्रेच्या बाजूने घोषणा देऊ लागले. सभागृहात यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यामुळे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.
शून्य काळामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी परिक्रमा यात्रेचा विषय उपस्थित केला. उत्तर प्रदेश सरकार उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत आहेत, असे सांगून ते म्हणाले, भाजपचे नेते राज्यघटनेचाही मान राखत नाहीत आणि न्यायालयाच्या निर्णयाचेही पालन करीत नाही. आपल्या भाषणामध्ये त्यांनी भाजपच्या नेत्यांना गुंड म्हटल्यावर त्यावर जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला. भाजपच्या सदस्यांनी मुलायमसिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी असे शब्द न वापरण्याची सूचना मुलायमसिंह यांना केली.