माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार मुरली देवरा यांचे सोमवारी पहाटे झालेले निधन आणि याआधी निधन झालेल्या अन्य लोकसभा व राज्यसभा सदस्यांना श्रद्धांजली वाहत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या सुरूवातील नरेंद्र मोदींनी सर्व नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. दिवंगत माजी सदस्यांना संसदेत श्रध्दांजली वाहण्यात आली. आज पहाटे निधन झालेल्या माजी पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे माजी खासदार मुरली देवरा यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. त्यापूर्वी लोकसभा व राज्यसभेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यात आली. गोपीनाथ मुंडे यांच्या जागी निवडून आलेल्या त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांनाही लोकसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. प्रीतम मुंडे यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.२३ डिसेंबपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असून या अधिवेशनात सरकारतर्फे विविध ३७ विधेयके संसदेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवली जाणार आहेत.