पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारामुळे पाच जवान शहीद झाल्याचे पडसाद मंगळवारी संसदेमध्ये उमटले. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करीत सरकार हे हल्ले टाळण्यात सातत्याने अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी याच विषयावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली.
लोकसभेमध्ये शून्य प्रहरात या विषयावर चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी थेट कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. कॉंग्रेस भारताच्या बाजूने आहे की पाकिस्तानच्या हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावेळी भाजपच्या काही खासदारांनी कॉंग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ, अशा घोषणा दिल्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कॉंग्रेसच्या खासदारांनी सिन्हा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्याचवेळी विरोधी पक्षांकडूनही सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी दोन वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्याबद्दल सभागृहात निवेदन केले. या निवेदनानंतरही सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून आपल्याला धोका असल्याचा इशारा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेमध्ये आपल्या भाषणावेळी दिला.
राज्यसभेत सर्वच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या विषयावर तातडीने चर्चा करण्याची आणि देशाची सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारने सभागृहात उत्तरे द्यावीत, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केली.