नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती देशभर साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने या वर्षीची लोकसभेची दिनदर्शिकाही गांधीजींचे विचार मांडणारी आहे. १९९९ पासून लोकसभा सचिवालय दर वर्षी संसदीय परंपरा कथित करणारी दिनदशिर्का प्रकाशित करते. २०१९ची दिनदर्शिका गांधीजींची शिकवण, त्यांचे आदर्श यावर आधारित आहे. गांधीजींच्या स्वातंत्र्यलढय़ातील प्रसंगांचे चित्रण तसेच, त्यांच्याशी निगडित वस्तू आणि साधनांमधून प्रकट होणारी मूल्ये यांचे विवेचन पाहायला मिळते.

देशातील शेवटच्या व्यक्तीलाही समान संधी मिळणे म्हणजे लोकशाही असे गांधीजी मानत. त्याचे प्रतीक संसद. त्यांनी दिलेला स्वदेशीचा मंत्र सांगणारा चरखा. गांधीजींचा चष्मा हा सत्य शोधाचे प्रतीक म्हणून दाखवण्यात आला आहे. नि:स्वार्थ भावातून निर्भयता दर्शवणारी पदयात्रा. स्वत:च्या हक्कांसाठी लढण्याचे बळ देणारा मिठाचा सत्याग्रह. साधनसामग्रीचा महत्त्व कथिक करणारे बापू. शांततेतून आत्मशोधाचा गांधीजींचा विचार. सत्यशोधनाची वाट. वेळचा सदुपयोग. बाह्य़ स्वच्छता आणि अंतर्मनाची स्वच्छता अशा गांधीजींच्या शिकवणीची प्रतीके या दिनदर्शिकेत पाहायला मिळतात.