लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने जालन्यातून विलास औताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने ३५ उमेदवाराची सातवी यादी जाहीर केली आहे. यात राज बब्बर यांना फतेहपूर सिक्री येथून उमेदवारी देण्यात आली आहे. मुरादाबाद येथे इम्रान प्रातपगढीया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेलंगणमधील खम्मम येथून माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी, आणि माजी केंद्रीय मंत्री करण सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांन जम्मू- काश्मीरमधील उधमपूर येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेसह काँग्रेसने शुक्रवारी रात्री ओदिशामधील विधानसभा निवडणुकीसाठी ५४ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी मुकाबला करण्यासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य लहान पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडी आणि जागावाटपाची आज, शनिवारी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तरीही आघाडीतील जागावाटपाचा घोळ अद्यापही मिटलेला नाही. काँग्रेसने दोन तर राष्ट्रवादीने त्यांच्या कोटय़ातील एक जागा मित्र पक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.