आम्ही सर्व लोक भाजपाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हा सर्वांना आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे सरकार यावे आणि पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत असे वाटते, अशी प्रतिक्रिया राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी दिली आहे. कल्याणसिंह यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह इतर विरोध पक्षांनी कल्याण सिंह यांच्यावर टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसतात. परंतु, कल्याणसिंह यांनी राजकीय व्यक्तीसारखे विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीगड येथे शनिवारी एका कार्यक्रमप्रसंगी कल्याणसिंह बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार यायला हवे. त्याचबरोबर मोदी हेच पंतप्रधान बनावेत. देशासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. मागील पाच वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने नवे विक्रम नोंदवले आहेत. आज देश केवळ अंतर्गत मुद्यांवरच चांगली कामगिरी करत नसून आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही देशाची पत वाढली आहे. दहशतवादावर केंद्र सरकारची नीती सर्वांच्या समोर आहे. सरकार केवळ कुटनीतीच नव्हे तर लष्करी सामर्थ्याच्या जोरावर दहशतवाद संपुष्टात आणेल, असे त्यांनी म्हटले. राजकीय नेत्याच्या थाटात कल्याण सिंह यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 modi should become pm once again says rajasthan governor kalyan singh
First published on: 25-03-2019 at 15:58 IST