27 February 2021

News Flash

अखेरचा हा तुला दंडवत

आम्ही तेच केलं. भल्या सकाळी चंद्रपुरात गृहखात्याचे राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या घरी गेलो.

|| गिरीश कुबेर, राजीव खांडेकर

श हरांत राहणाऱ्यांच्या मनात गावात राहणाऱ्यांविषयी उगाचच एक रोमँटिसिझम असतो आणि गावात राहणाऱ्यांस शहरांत राहणारे चिक्कार पसाच कमावतात असं वाटत असतं. यात अजूनही बदल झालेला नाही. त्यामुळे शहरांत राहणारे आपल्या आयुष्यातनं उगाचच काही तरी हरवल्यासारखे जगतात आणि खेडय़ातले एक कमीपणा घेऊन. खेडय़ातलं आयुष्य रम्य असतंच असं नाही आणि शहरांतल्या प्रत्येकाला रग्गड पसा मिळतच असतो असं नाही. या दोन्ही कल्पना ज्यांच्या मनातनं अजूनही गेलेल्या नसतील तर त्यांनी चंद्रपूरलगतच्या कोणत्याही खेडय़ात सहज फेरफटका मारायला हरकत नाही.

आम्ही तेच केलं. भल्या सकाळी चंद्रपुरात गृहखात्याचे राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या घरी गेलो. अहिर एरवी तसे शांत स्वभावाचे. चिडचिड करतात असा काही अनुभव नाही; पण त्या दिवशी जरा ते किरकिरे वाटले. त्यांच्या विरोधातला तिसरा उमेदवार माघार घेत होता. त्यामुळे त्यांची आणि काँग्रेसच्या उमेदवारची थेट लढत होईल अशी चिन्हं होती. त्यामुळे त्यांचा बहुधा संयम सुटला असावा. त्यांचं घर वंशपरंपरागत. मुख्य रस्त्याला उजवीकडे ठेवून छोटय़ाशा गल्लीतनं जावं लागतं. गल्लीच्या तोंडाशीच तिथल्या घराचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे नुसती धूळच धूळ. विदर्भात सकाळी तसं लवकरच उजाडतं. ६ वाजतासुद्धा १२ वाजल्यासारखं ऊन, रणरणतं. आठ-सवा आठच्या दरम्यान अहिरांच्या गल्लीत पोचलो तर त्या तोंडावरच्या घरांचं काम सुरू झालं होतं. दुपारी काम करणं इतक्या उन्हात अशक्यच. म्हणून तिथं कामं लवकर सुरू करतात.

घरात अहिरांच्या कार्यकर्त्यांची लगबग दिसत होतीच. त्यांचाही दिवस लवकर सुरू होतो या काळात. गप्पांत पंधरा-वीस मिनिटांतच ते विरोधकांच्या मुद्दय़ावर अस्वस्थ झाले. बास आता, असं म्हणून उठायला लागले; पण त्यांनाच लक्षात आलं असं करणं कॅमेऱ्यात बरं दिसणार नाही. मग बसले आणि पुढे परत तासभर गप्पा झाल्या.

अहिरांच्या घरातनं बाहेर पडून शब्दश: चार पावलं चाललं की सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं घर. त्यांनाही म्हटलं होतं येतो म्हणून. मोकळा माणूस. एकदम साधे. सुधीरभाऊ घरातल्या दोघांशी गप्पा मारतानाही दोन हजारांच्या सभेला उद्देशून बोलत असावेत अशा गडगडाटात बोलतात. त्या दिवशी तर सायंकाळी त्यांची नागपुरात सभा होती. त्याची रंगीत तालीम त्यांनी आमच्याशी गप्पा मारताना करून घेतली बहुधा. ‘खऱ्यांना नोबेल्स पारितोषिक दिलं जातं, तर खोटय़ांना गोबेल्स’, अशी चटपटीत वाक्यं ते सहज फेकत होते. तासभर असू त्यांच्या घरात, पण शब्दगंगेत न्हाऊन चिंब चिंब झालो.

पण पुढचा दिवस कोरडाठक्क होता. जवळच्याच एका खेडय़ात गेलो. मुळात चंद्रपूरच तसं भकभकीत. त्यात उन्हाळा. सूर्य आग ओकत होता म्हणणं वगरे वाक्य अगदीच निर्थक. गावापासून जसजसं लांब जात होतो तसतशी डोळ्यांची जळजळ, अंगाची आग वाढतच चालली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना करडय़ा रंगांच्या मातीचे डोंगर. त्यावर एक गवताचं पातंसुद्धा आढळणार नाही असे बोडके. त्यांच्या पायाशी, आसपास वावरणाऱ्या माणसांच्या अंगांवरही तो तसाच करडा पूट. प्रत्येकाच्या गळ्याभोवती गमचे. डोक्याला मुंडांसं. सगळेच उन्हानं करवादलेले. असंच फिरत फिरत त्या गावात उतरलो.

..आणि भट्टीत शिरल्याचा भास झाला. मूíतमंत भट्टी. आसपास झाडंझुडपंदेखील नाही. गावात शिरण्याआधी एक भुरटं जंगल. शेजारी ‘वाघापासून सावध राहा’ असे फलक; पण नंतर नंतर तेही संपतात आणि मग नुसताच फुफाटा. तिथल्या एकाला विचारलं तर तो म्हणाला, पहाटे ४ वाजता आलात तरी फुफाटा असाच असतो. आम्हाला त्याची आता सवय झालीये.

अशा हलाखीची सवय होणं हेच मुळात किती दु:खदायक. चांगल्याची सवय झालीये ते ठीक; पण वाईटाची, वेदनांची सवय होणं म्हणजे खरं तर जगण्याचाच पराभव.

तो त्या गावात ठायीठायी दिसतो. ती गावंच खाणींत वसलीयेत. खदाणी म्हणतात त्यांना तिकडे. चारी बाजूंनी खाणींतून बाहेर आलेला तो करडा, मेलेल्या मातीचा कचरा आणि मधे ते गाव. आसपासचे ते डोंगर ताप ताप तापतात आणि मधल्या गावांना मग होरपळून काढतात. त्या मातीच्या डोंगरांत कसलाच जीव नसतो. तो गावकरी म्हणाला, पावसाळ्यात ती डोंगरावरची माती घसरून खाली येते आणि नुसती दलदल सगळीकडे. काळी दलदल. पाऊस नसतो तेव्हा असा फुफाटा आणि नसतो तेव्हा दलदल.

आमची भेट हा फुफाटय़ाचा काळ. गावात कोपऱ्यावर चार जण एका झाडाच्या मूठभर सावलीत पत्ते खेळत बसले होते. भर सकाळी ११ वाजता पत्ते? तिथे दोन क्षण थांबता येत नव्हतं आणि हे पत्ते खेळत बसले होते. आमच्याबरोबरचे कॅमेरामन फोटो काढायला गेले तर म्हणाले.. काढू नका.. आमच्या नोकरीचा वेळ आहे हा.

समोर कोळशाच्या खाणीच खाणी. तिथे हे गाव. प्रत्येक घराला पांढरा रंग. एकच किराणा मालाचं दुकान. गप्पांसाठी गावकऱ्यांना एकत्र गोळा केलं. सगळे जमले भर उन्हात. जरा काही विचारलं तर भकाभका बोलायला लागले. कसे हाल आहेत इथं जगणं म्हणजे. ते खरंही होतं. पर्यावरण रक्षण वगरे काही प्रकारच नसतो किंवा असलाच तरी तो कागदावर. श्वास घेताना ती धूळ आपल्या नाकात जातीय हे जाणवत होतं. अवघ्या अध्र्या तासात अशी जाणीव होत असेल तर तिथं कायम राहणाऱ्यांचं काय होत असेल हा साधा प्रश्न.

तर ते समोरचे दोन गावकरी म्हणाले.. काय होणार? टीबी किंवा कॅन्सर.. घरात दोन्हीपकी या आजाराचा एक तरी रुग्ण असतो. त्या वीसेक जणांत एक जण फक्त म्हणाला, खाणींमुळे माझं भलं झालं.. तीन कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली. तर दुसरा म्हणाला.. हा अहिरांचा कार्यकर्ता आहे म्हणून पसे मिळाले.

बाकी गावात सगळाच आनंद. फक्त व्याधी अणि व्यथा. यातून सुटका कशी?

तर गावकरी म्हणाले.. आता आमचं गावच्या गावच हलवणार आहेत. सगळं खाणीत जाणार.

कुठे जाणार ?.. खाणवाले देतील त्या जागेवर.  क्रमश:

girish.kuber@expressindia.com

nrajivk@abpnews.in

@girishkuber

@rajivkhandekar

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 1:01 am

Web Title: lok sabha election 2019 reality of congress image rajiv khandekar girish kuber 2
Next Stories
1 ‘मिशन शक्ती’ मधील चाचणी धोका टाळण्यासाठी कमी उंचीवर- रेड्डी
2 आरोपपत्र फुटल्याची चौकशी करण्याची ईडी, मिशेल यांची न्यायालयाकडे मागणी
3 भाजप-सेना खासदारांच्या मालमत्तेत ६० टक्क्यांनी वाढ
Just Now!
X