लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी कर्नाटक युवा मोर्चाचे सरचिटणीस २८ वर्षीय तेजस्वी सूर्या यांना प्रतिष्ठित बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री अनंत कुमार हे या मतदारसंघातून निवडून आले होते. तेजस्वी सूर्या यांची उमेदवारी हा अनंत कुमार यांच्या पत्नीला धक्का मानला जातो. कारण या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. १९९६ पासून सलग सहा वेळा अनंत कुमार हे येथून निवडून आले होते. तेजस्वी हे कर्नाटक उच्च न्यायालयात वकिली करतात. ते भाजपाच्या सोशल मीडिया टीमचे सदस्यही आहेत. या मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सूर्या यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, हे देवा.. मला विश्वास बसत नाही की जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील पंतप्रधान आणि सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी बेंगळुरू दक्षिणसारख्या प्रतिष्ठित जागेसाठी माझ्यासारख्या २८ वर्षीय युवकावर जबाबदारी दिली. हे फक्त भाजपामध्येच होऊ शकते. फक्त नरेंद्र मोदी यांच्या न्यू इंडियातच हे शक्य आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले.

काँग्रेसने सोमवारी राज्यसभा सदस्य बी के हरिप्रसाद यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने बेंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून अश्वत नारायण यांना तिकीट दिले आहे. त्यांची लढत काँग्रेसचे खासदार डी के सुरेश यांच्याबरोबर असेल. सुरेश हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

कर्नाटकात २ टप्प्यात मतदान होणार आहे. १८ आणि २३ एप्रिल रोजी १४-१४ जागांसाठी मतदान होईल.