गेल्या वर्षभरापासून देशातील राजकारण ढवळून काढत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि वेळापत्रकाची घोषणा बुधवारी सकाळी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात नवी दिल्लीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून या तारखांबरोबरच देशात आचारसंहिताही लागू केली जाणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुका या एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मे महिन्यापर्यंतच्या कालावधीत सहा-सात टप्प्यांत घेण्यात येण्याची शक्यता आहे. हा कालावधी आजवच्या लोकसभा निवडणुकांतील सर्वात मोठा कालावधी असेल, असे मानले जात आहे. निवडणुकीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर होणार असले तरी ७ किंवा १० एप्रिलदरम्यान मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल, असे संकेत मिळत आहेत. विद्यमान लोकसभेची मुदत १ जून रोजी संपत असल्याने ३१ मेपूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे मेच्या मध्यात मतमोजणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकासोबतच आचारसंहिताही लागू होणार आहे. निवडणुकीच्या तारखेसोबत आचारसंहिता लागू होऊ नये, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीममध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

वैशिष्टय़पूर्ण निवडणूक
* लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठा कालावधी.
* इलेक्ट्रॉनिक मतदानाची कागदावरही नोंद करण्यासाठी काही मतदारसंघांत प्रथमच ‘पेपर ट्रेल’ पद्धतीचा अवलंब
* वचनांसोबत त्यांच्या पूर्ततेचा आराखडा मांडण्याचे राजकीय पक्षांना बंधन.
* ८१.४ कोटी मतदार.
* मोठय़ा शहरांतील उमेदवारांना ७० लाख निवडणूक खर्चाची परवानगी.
* मतदारांना ‘वरीलपैकी कोणी नाही’ (नोटा) हा पर्याय.