लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजयश्री आपल्याकडे कोण खेचून आणेल यावरील तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशातच भाजपाच्या विजयाचे भाकित करणे एका प्राध्यापकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असे भाकित मध्य प्रदेशातील उजैनमधील विक्रम विद्यापीठातील संस्कृतच्या एका प्राध्यापकाने केले होते. त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई केल्याचे सांगत सोमवारी त्या प्राध्यापकाचे निलंबन करण्यात आले आहे.

राजेश्वर शास्त्री मुसळगावकर असे या प्राध्यापकाचे नाव असून मध्य प्रदेश विद्यापीठ कायदा 1973 अंतर्गत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. मुसळगावकर यांनी 29 एप्रिल रोजी आपल्या फेसबुक पेजवर भाजपाला सुमारे 300 जागा मिळतील आणि रालोआला 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे भाकित वर्तवले होते. काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने मुसळगांवकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, आपण केलेले भाकित हे कोणत्याही पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी केलेले नसून एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर असल्याची प्रतिक्रिया मुसळगावकर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. तसेच आपण सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय पक्षांवर होणारा ग्रहांचा परिणाम यावरून हे विश्लेषण केले होते. एका विद्यार्थ्यांने आपल्या परवानगीशिवाय आपल्या मोबाइलचा वापर करून ती कमेंट फेसबुकवर टाकल्याचा दावाही त्यांनी बोलताना केला. ज्यावेळी याबद्दल माहिती मिळाली त्यावेळी त्वरित ही कमेंट काढून टाकली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्याला निलंबनाविरोधात न्यायालयातही दाद मागण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप मुसळगावकर यांनी केला. मध्य प्रदेश काँग्रेसचे सचिव बबलू खिंची यांनी मुसळगावकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं भाकित ट्विट केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.