मतपडताळणी प्रक्रियेमुळे अधिकृत घोषणेस पाच ते सहा तास अधिक लागण्याची चिन्हे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार असली तरी प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास यावेळी नेहमीपेक्षा किमान पाच तास उशीर होण्याची शक्यता आहे.

मतदानोत्तर चाचण्यांनी नानाविध अंदाज व्यक्त केले असले तरी, लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालात कोणत्या राजकीय आघाडीला कौल मिळतो याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरू होताच अवघ्या काही तासांमध्ये निकालांचा कल स्पष्ट होऊ लागेल मात्र, लोकसभा मतदारसंघनिहाय अधिकृत निकाल विलंबाने लागण्याचीच चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच मतपावती जोडलेल्या मतदान यंत्रांचा (व्हीव्हीपॅट) वापर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांमध्ये मतदानयंत्रे आणि मतपावत्या याआधारे मतपडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतपावती जोडलेल्या ३० मतदान यंत्रांची पडताळणी झाल्यानंतरच निवडणूक अधिकारी अधिकृत निकाल जाहीर करतील. देशभरात ५४२ लोकसभा मतदारसंघांमधील १०.३ लाख मतदानकेंद्रांवर मतदान झाले असून मतपावती जोडलेल्या १६,२६० मतदान यंत्रांची पडताळणी केली जाणार आहे. या मतपडताळणी प्रक्रियेसाठी पाच ते सहा तासांचा कालावधी जास्त लागणार असल्याने अधिकृत निकालांना उशीर होणार आहे.

केवळ मतदान यंत्रांमधील मतमोजणीची प्रक्रिया तुलनेत कमी वेळेत पूर्ण होत असल्याने आठ ते दहा तासांमध्ये बहुतांश लोकसभा मतदारसंघांतील निकाल जाहीर होत होते. तसेच निकालाचा कल मतमोजणी सुरू झाल्यानंतर तीन-चार तासांमध्ये स्पष्ट होत असे.

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी सुरू झाली आणि सात टप्प्यांमध्ये मतदान होऊन १९ मे रोजी संपली. यावेळी अपक्षांसह विविध पक्षांचे आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या सर्वाचे भवितव्य गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत निश्चित होईल. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणीत ‘एनडीए’ आघाडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. काही चाचण्यांनी ‘एनडीए’ला तीनशेहून अधिक जागा मिळतील, असे भाकित केल्यामुळे भाजपमध्ये उत्साह संचारलेला दिसतो. विजयाची पुनरावृत्ती होण्याची खात्री वाटत असल्याने दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात सजावट केली जात आहे. विरोधकांनी मात्र मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज अमान्य केले असून बनावट मतदानोत्तर चाचण्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.