एका कुटुंबाच्या हितालाच काँग्रेसचे प्राधान्य : मोदी * स्मारकाइतकेच जवानांचे प्राण वाचविणेही महत्त्वाचे : काँग्रेस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आजवर संरक्षण क्षेत्रात झालेले सर्व घोटाळे हे काँग्रेसच्याच राजवटीत झाले आहेत. आता देशाचे हित की एका कुटुंबाचे हित, याची निवड करायची आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी केली. यानंतर मोदींच्या वक्तव्यावर विरोधकांनीही जोरदार टीका केल्याने राजकीय वर्तुळात शाब्दिक युद्धाला तोंड फुटले.

मोदी म्हणाले की, देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसने नेहमीच देशहितापेक्षा एका कुटुंबाच्या हितालाच महत्त्व दिले. बोफोर्सपासून ऑगस्टा वेस्टलॅण्डपर्यंत जेवढे घोटाळे झाले ते काँग्रेसच्याच काळातले होते. आता राफेल विमाने देशात येऊ नयेत, यासाठी या पक्षाने चंग बांधला आहे. २००९मध्ये सेनादलांनी १ लाख ८६ हजार बुलेटप्रूफ जॅकेट मागितली होती, पण ती दिली गेली नाहीत. आम्ही साडेचार वर्षांत २ लाख ३० हजार जॅकेट दिली आहेत.

देशाच्या संरक्षण क्षेत्राची काँग्रेसने सर्वाधिक हेळसांड केली, असा आरोपही मोदी यांनी केला. स्वत:ला भारतभाग्यविधाते म्हणवून घेणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. देशहिताऐवजी एका कुटुंबाचे हित जोपासण्याच्या या प्रवृत्तीमुळेच  आजवर युद्धस्मारकदेखील बांधले गेले नव्हते, अशी विरोधकांच्या कर्तृत्वातील कुचराई कोणती, याबाबतचे आकलनदेखील मोदींनी मांडले. ते म्हणाले, गेल्या सात दशकांत शहीदांना आदरांजली वाहणारे राष्ट्रीय स्मारकच नव्हते. गेल्या दशकभरात एक-दोन प्रयत्न झाले, पण त्यामागे बळ नव्हते. आम्ही २०१४मध्ये या स्मारकाच्या उभारणीला सुरुवात केली आणि आता ते प्रत्यक्षात साकारते आहे.

मग ‘शहीद’ दर्जा का नाकारता?

एकीकडे शहीदांना श्रद्धांजली वाहणारे स्मारकच नव्हते, असे म्हणता आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सीआरपीएफच्या ४१ जवानांना शहीद दर्जा का नाकारता, असा सवाल करीत काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विपण्णीवर टीका करताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजु म्हणाले की, राहुल यांना संकेत आणि नियम कदाचित माहीत नसावेत. पण देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या लष्करी किंवा निमलष्करी अशा कोणत्याही जवानांना शहीद म्हणूनच संबोधले जाते.

विशेष म्हणजे, पुलवामा हल्ल्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना केंद्र सरकारने, सीआरपीएफला वेतनवाढ देण्यास विरोध केला होता. तो मुद्दा पुन्हा मांडताना राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, सीआरपीएफ जवानांना शहीद दर्जा देण्याच्या माझ्या सूचनेच्या आड मोदी यांचा अहंकार येत आहे, पण निदान निमलष्करी दलातील जवानांचे पगार तरी वाढवून द्या! सर्वोच्च न्यायालयात तुम्ही पगार वाढविण्यास विरोध केला आहे!

काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, अशा स्मारकांचे आम्ही समर्थन करतो, पण नुसती स्मारके उभारून आपली जबाबदारी संपत नाही. जवानांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही काय करतो, यालाही महत्त्व आहे. उरीत १९ आणि पुलवामात ४१ असे सर्वाधिक जवान आम्ही गमावले आहेत. त्यांचे प्राण वाचविण्यात आम्ही कुठे आणि का कमी पडलो, याचाही शोध घेतला पाहिजे.

राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण..

स्वातंत्र्यापासून देशासाठी लढताना ज्या ज्या जवानांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी हे स्मारक बांधण्यात आले आहे. तब्बल ४० एकरच्या परिसरातील या स्मारकासाठी १७६ कोटी रुपये खर्च झाला आहे. स्मारकात २९०० शहीदांची नावे सुवर्णाक्षरात कोरली आहेत.