अलीकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्याने लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
देशभरात काँग्रेसविरोधी मोठी लाट आली असून जनतेला भ्रष्टाचार, गैरकारभार आणि यूपीए सरकारला सर्व आघाडय़ांवर आलेल्या अपयशाचा उबग आला आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचा झालेला उदय हे जनतेच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, असेही रामदेव म्हणाले.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊ शकत नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी स्वकर्तृत्व सिद्ध केले आहे, तर राहुल गांधी यांच्याकडे केवळ वारसा हक्क आहे, असेही योगगुरू म्हणाले.
आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध करावयाचे आहे, मात्र अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फारकत घेऊन गुरु-शिष्याचे नाते जपले नाही, असेही रामदेव म्हणाले.