मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचे स्पष्टीकरण

लखनऊ : देशात लोकसभेच्या आगामी निवडणुका नियोजित वेळेतच होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर अरोरा यांना वार्ताहरांनी प्रश्न विचारला होता.

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अरोरा दोन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आले आहेत. देशात लोकसभेच्या आगामी निवडणुका नियोजित वेळेतच होतील, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाच्या नव्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांना देशातील संपत्तीसमवेतच परदेशातील संपत्तीचीही सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले. प्राप्तिकर विभाग त्याबाबत लक्ष ठेवणार असून कोणत्याही प्रकारची विसंगती आढळल्यास ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकली जाईल आणि संबंधिताविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही अरोरा यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएमचा ‘फुटबॉल’!

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) फुटबॉलसारखा वापर करण्यात येत असल्याचे सुनील अरोरा म्हणाले. ईव्हीएमच्या कामाच्या पद्धतीवर राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्याच्या पाश्र्वभूमीवर अरोरा यांनी वरील मत व्यक्त केले. ईव्हीएमचा वापर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ करण्यात येत आहे. जर विशिष्ट निकाल आले तर ईव्हीएम उत्तम आहे आणि निकाल मनासारखे आले नाहीत तर ईव्हीएम सदोष आहेत. जाणतेपणी अथवा अजाणतेपणाने आपण ईव्हीएमचा फुटबॉल केला आहे, असे अरोरा म्हणाले. जनतेच्या भावनांची दखल घेऊन आम्ही व्हीव्हीपीएटीचा वापर सुरू केला आहे. सुरुवातीला काही समस्या होत्या, मात्र आता योग्य व्यवस्था करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.