माजी निवडणूक आयुक्त कृष्णमूर्ती यांचा इशारा

हैदराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत पैशांचा अतिरेकी वापर, हिंसाचार आणि द्वेषभावनेचा फैलाव यांसारखे प्रकार होण्याची शक्यता माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला जाईल. हिंसाचार आणि द्वेषमूलक प्रचार केला जाईल असे राजकीय पक्षांच्या आताच्या वर्तणुकीवरून दिसत आहे. राजकीय पक्ष एकमेकांशी भांडत असल्याने गुंते निर्माण होतात. अशा परिस्थितीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करणे हे निवडणूक आयोगापुढचे आव्हान आहे. ते पेलण्यास निवडणूक आयोग सक्षम आहे, असेही कृष्णमूर्ती यांनी सांगितले.

निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यास विलंब होत असल्याबाबत होणाऱ्या टीकेबाबत कृष्णमूर्ती म्हणाले, ‘राज्यांमधील परिस्थिती पाहून निवडणुकीच्या तारखा ठरवाव्या लागतात. त्या ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. पुढची लोकसभा केव्हा स्थापन व्हावी याची मुदत ठरलेली असते. जेव्हा संस्था त्यांचे काम करीत असतात, तेव्हा त्यांना ते करू द्यावे, त्याबाबत प्रश्न उपस्थित करू नयेत.’ मोदी यांचे अधिकृत प्रचार दौरे पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार आहे काय, असा सवाल काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सोमवारी केला होता. त्या अनुषंगाने कृष्णूर्ती यांना प्रश्न विचारण्यात आला होता. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात विलंब करीत असल्याबाबत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यावरील सूचना त्यांनी फेटाळून लावल्या.