राहुल गांधी कुठे आहेत ? हा प्रश्न लोकसभेच्या पहिल्या सत्रात शपथविधीसाठी हजर असणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना सतावत होता. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. पहिल्या सत्रात शपथविधी सुरु असताना राहुल गांधी उपस्थित नव्हते. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी टोमणा मारत राहुल गांधी कुठे आहेत ? असा प्रश्न विचारला होता.

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा होताच बाकं वाजवत त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर भाजपाच्या अनेक सदस्यांनी ‘मोदी…मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ घोषणा देण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदी सभागृहाचे नेते असल्याने सर्वात पहिली शपथ घेतली. नरेंद्र मोदींनी शपथ घेताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेसकडे इशारा करत राहुल गांधी कुठे आहेत ? असं विचारलं.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी सार्वजनिक ठिकाणांवर जाण्याचं टाळताना दिसत आहेत. अमेठीत स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव करत इतिहास रचला आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींना अमेठीतून हरवून संसदेत पोहोचलेल्या स्मृती इराणी खासदारकीची शपथ घेताना सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवून जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील बराच वेळ बाक वाजवत अभिनंदन करत होते.

जेव्हा आठवले यांनी प्रश्न विचारला तेव्हा काही नेत्यांनी ते शपथ घेण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं. यानंतर काही वेळातच राहुल गांधी यांनी आपण शपथ घेणार असल्याचं ट्विट केलं.

राहुल गांधी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सभागृहात पोहोचले आणि पुढच्या अर्ध्या तासात शपथ घेतली. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी करण्यास विसरले होते. त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी रजिस्टरवर स्वाक्षरी केलाी.