आर्थिक घोटाळा करणाऱ्यांची मालमत्ता आता कायद्यानेच जप्त होणार आहे. यासंबंधातले एक विधेयकच आज लोकसभेत मंजूर करण्यात आले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या घोटाळेबाजांना चाप लावण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आर्थिक घोटाळेबाजांना चाप लावणारे हे विधेयक आहे. या विधेयकाच्या मंजुरीमुळे घोटाळेबाजांच्या मालमत्तेवर सरकारला टाच आणता येणे शक्य होणार आहे.

१०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा घोटाळा करून जो कोणी पळून गेला असेल अशा सगळ्यांच्या मालमत्तेवर या कायद्यान्वये टाच आणता येणार असल्याचे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. २०१४ पर्यंत यासंदर्भात काहीही करण्यात आले नव्हते, असेही गोयल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. आर्थिक घोटाळेबाजांना चाप लावण्यासाठी अशा प्रकारचे विधेयक आणण्याबाबत एप्रिल २०१८ मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. नीरव मोदीने केलेला १३ हजार कोटींचा घोटाळा, मेहुल चोक्सीने त्याला दिलेली साथ यावर या बैठकीत चर्चा झाली होती. तसेच असे घोटाळेबाज देशाबाहेर पळून जातात त्यांना परत आणताना तपास यंत्रणांना कशा अडचणी येतात याबाबतही चर्चा झाली होती. आता आर्थिक घोटाळेबाजांना चाप लावण्यासाठी सरकारने नवे विधेयकच आणले आहे.