लोकसभेमध्ये बुधवारी ई-सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर झाल्यानंतर ई-सिगारेटचे उत्पादन, आयात आणि विक्री गुन्हा ठरणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात ई-सिगारेटवर बंदी घालणारा अध्यादेश काढण्यात आला होता.

आता ई-सिगारेटच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्रीला मज्जाव करणारे नवीन विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल. सर्वच पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचा या विधेयकाला पाठिंबा होता.

फक्त ई-सिगारेटवर बंदी घालून थांबू नका तर तंबाखूजन्य सिगारेटही शरीराला हानीकारक आहे. त्यामुळे ई-सिगारेटप्रमाणे त्यावरही बंदी घालावी अशी बहुसंख्य खासदारांची मागणी आहे.

ई-सिगारेट म्हणजे नेमके काय? हे आहेत धोके
‘सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ई-सिगारेटचा वापर करा,’ असा अपप्रचार अनेकदा केला जातो. मात्र ई-सिगारेटही आरोग्यासाठी हानिकारकच आहे. ई-सिगारेट म्हणजे काय, तिची लोकप्रियता कोणत्या मुद्दय़ावर वाढली, या सिगारेटबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांचे आक्षेप काय आहेत, याबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.

ई-सिगारेट म्हणजे काय ?
जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. फरक असा, की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.

ई -धूम्रपान म्हणजे?
द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.