अधिवेशन संस्थगित, गोंधळातच चौदा विधेयके संमत
सातत्याने सभागृहात घोषणाबाजी करून कामकाज ठप्प करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात केलेली वादग्रस्त टिप्पणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कामकाजातून वगळावी लागली. महाजन यांच्या टिप्पणीवर काँग्रेस खासदारांनी आक्षेप घेतला. काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, तुमच्या टिप्पणीमुळे आम्हाला अत्यंत वाईट वाटत असल्याची भावना व्यक्त केली. खरगे यांच्यासह सर्वच काँग्रेस खासदारांची नाराजी टाळण्यासाठी महाजन यांनी स्वतच्या ‘त्या’ टिप्पणीविषयी सभागृहात माफी मागितली. त्यानंतर महाजन यांनी स्वतचे वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले. दरम्यान लोकसभेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले असून, या अधिवेशनात एकूण १४ विधेयके गोंधळातच मंजूर करण्यात आली.
नॅशनल हेरॉल्ड, डीडीसीए प्रकरणावरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांना उद्देशून महाजन म्हणाल्या होत्या की, ‘..त्यांना राष्ट्रिय हित महत्त्वाचे नाही. त्यांना केवळ परस्पर हितसंबंध महत्त्वाचे आहेत.’ कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव महाजन यांनी घेतले नव्हते. त्यांच्या विधानावर आक्षेप घेताना खरगे म्हणाले की, कुणा एका राजकीय पक्षाला अशा दृष्टिकोनातून पाहणे व टिप्पणी करणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष राष्ट्रीय हितापेक्षा हितसंबंधांच्या राजकारणाला महत्त्व देत असल्याचा संदेश त्यामुळे देशवासीयांमध्ये जाण्याची भीती आहे. त्यामुळे ‘ते’ विधान कामकाजातून वगळण्यात यावे. खरगे यांच्या आक्षेपावर संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू संतप्त झाले. अध्यक्षांच्या टिप्पणीवर चर्चा करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यावर- मला बोलण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही. मी अध्यक्षांच्या परवानगीने बोलत असल्याचे खरगे यांनी सुनावले. प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस सदस्यांनी महाजन यांना स्वतचे विधान कामकाजातून वगळण्याची विनंती केली. या वेळी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सरकारकडून कुणीही महाजन यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करू शकले नाही. अखेरीस या वादावर पडदा टाकण्यासाठी महाजन यांनी स्वतच्या वक्तव्याची क्षमा मागून ते कामकाजातून वगळण्याची सूचना केली. त्यानंतर विरोधकांचा राग शांत झाला.

हिवाळी कामकाज
नवी दिल्ली : अधिवेशन २० दिवस चालले, पण तुलनेने त्यात गेल्या मान्सून अधिवेशनापेक्षा जास्त काम झाले. पावसाळी अधिवेशन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरील गोंधळात विस्कळीत झाले होते. नवीन वर्षांत नवी आशा व ऊर्जा येईल व आपण संसदीय साधनांचा योग्य उपयोग करून वेगाने निर्णय घेऊ. जर मतभेद असतील तर ते संयमित पद्धतीने मांडले जातील व सभागृहातील गोंधळाचे प्रसंग कमी होतील, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी कामकाजाच्या समारोपात सांगितले.