लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मत

नवी दिल्ली : कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मेगौडा (६४) यांच्या मृत्यूची स्वतंत्र यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी येथे सांगितले.

कर्नाटकच्या चिक्कमगळुरू जिल्ह्य़ातील रेल्वेमार्गात मंगळवारी सकाळी धर्मेगौडा यांचा मृतदेह सापडला होता, मात्र हा आत्महत्येचा प्रकार असावा असा दावा पोलिसांनी केला होता.

कर्नाटक विधान परिषदेचे सभापती के. प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी म्हणजे १५ डिसेंबर रोजी सभागृहात गोंधळ झाला होता. त्यावेळी धर्मेगौडा सभापतींच्या आसनावर बसले होते त्यांना काँग्रेसच्या सदस्यांनी आसनावरून खाली खेचले. नियमांच्या विरोधात ते उपसभापती म्हणून आसनस्थ झाल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला होता.

धर्मेगौडा आसनावर बसलेले असताना सभागृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, हा लोकशाहीवरील हल्ला आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूची स्वतंत्र यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे बिर्ला यांनी म्हटले आहे.