शनिवारी एक जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात या वर्षीच होणाऱ्या विधानसभेच्या रणनितीवरही चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता पक्षाची जनरल बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकसभा आणि आगामी विधानसभा याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं ३०० जागांचा तर रालोआनं ३५० चा टप्पा गाठला व सर्व विरोधकांना निष्प्रभ केलं. महाराष्ट्रात तर काँग्रेसला अवघी एक तर राष्ट्रवादीला पाच जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा धसका इतका प्रचंड होता की काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. पुढील एक महिना काँग्रेसच्या वतीनं कुणीही वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले आहे.

राहूल गांधी यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली व त्यांच्याकडून सल्ला घेतल्याचे वृत्त आहे. अवघ्या चार ते पाच महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार असून लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं या बैठका घेण्याचे ठरवले आहे.