उत्तर प्रदेशसह देशातील चार राज्यांमधील निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर भाजपमधील टीम मोदी पुन्हा एकदा निवडणुकीच्या कामात जुंपली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु झाली आहे. ६ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत भाजप जनतेशी संवाद साधण्यासाठी एक उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमाअंतर्गत भाजपचे खासदार २०१४ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झालेल्या मतदार संघात एक दिवस मुक्काम करणार आहेत.
केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप हा नेहमीच इलेक्शन मोडवर असतो असे म्हटले जाते. लोकसभेनंतर महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश अशा महत्त्वाच्या निवडणुकीसाठी पक्षाने कसून तयारी केली होती. आता उत्तर प्रदेशमधील महत्त्वाची निवडणूक पार पडल्यावर भाजपने २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ६ ते १४ एप्रिल या कालावधीत भाजप जनसंपर्क मोहीम राबवणार आहे. भाजपचे खासदार आणि नेते जनतेत जाऊन त्यांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला. तिथेही पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार एक दिवसाच्या मुक्कामासाठी जातील अशी माहिती सूत्रांनी दिली. १४ एप्रिलला या मोहीमेचा समारोप होईल. या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या माध्यमातून पक्षाला दलित आणि मागासवर्गीयांमध्ये जनाधार वाढवायचा आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजप खासदार पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारसंघातील ख्यातनाम मंडळींची भेट घेतली. मतदारसंघातील जनता आपल्यासोबत खूश का नाही, त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या मोहीमेच्या माध्यमातून होईल. याशिवाय केंद्र सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही खासदारांकडे सोपवण्यात आले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि अन्य नेते मंडळी पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसतील असे समजते. पश्चिम बंगालमध्ये चांगली संधी असल्याचे भाजपला वाटते. याशिवाय बिहारवरही भाजप विशेष लक्ष देणार अशी चर्चा आहे. अर्थमंत्री अरुण जेटली बंगळुरु, अमित शहा तेलंगणमधील निझामाबाद मतदारसंघात असतील असे पक्षातील नेत्यांनी सांगितले. आता ही मोहीम भाजपला फलदायी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 1:31 pm