अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा आरोप कांग्रेसने भाजपावर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपावर आरोप केला आहे.  पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओ यावेळी जारी केला आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून १.८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. भाजपा हा पैसे मते विकत घेण्यासाठी वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

 अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल का केला नाही? असाही पश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. या प्रकरणावर तीन जणावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांचा समावेश आहे.

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा प्रकार तेव्हा झाला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या दिवशी अरूणाचल प्रदेशमध्ये रॅली होणार होती. निवडणुक आयोगाच्या आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेसै जप्त करण्याचा व्हिडीओ सोशल मीडिायवर व्हायरल झाला आहे. गेस्ट हाउसमध्ये उपस्थित पाच गाड्यातून पैसे जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या पैशांच्या मदतीने मते विकत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.