शिवसेना हा लाचारीत घरंगळत गेलेला पक्ष असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी आपला विरोध नरेंद्र मोदी व अमित शाह या दोघांना असून केवळ त्यांना सत्ता मिळता कामा नये हे आपलं एकमेव म्हणणं असल्याचं सांगितलं. सत्ता व पैशासाठी शिवसेना लाचार असून त्यांची भाजपाशी युती होणार हे मी आधीच सांगितलं होतं असं राज म्हणाले. युती झाली नसती तर शिवसेना फुटली असती असा दावाही त्यांनी केला. एकमेकांवर प्रेम करणारे भाजपा व शिवसेना हे पक्ष नसून कधी एकमेकांचा गळा घोटतो अशी स्थिती असल्याची टीका त्यांनी केली.

काॅंग्रेस अथवा राष्ट्रवादीला मतं द्या असं माझं आवाहन नसून भाजपा व त्यांचे मित्रपक्ष यांना मत देऊ नका कारण या दोघांना फायदा होऊ नये हे माझं सांगणं आहे असे राज म्हणाले.

“२०१४ मध्ये मोदींच्या लाटेमध्ये अनेकजण निवडून आले. परंतु आता लाट वगैरे काही नाही. निवडणुकीचा माहोलही कुठे नाही. पाच वर्षांपूर्वी इतकी आश्वासनं मोदींनी दिली त्याचं काय झालं हे विचारणं आपलं काम आहे. करोडो नोकऱ्या गेल्या, जीएसटी नोटाबंदी फसली हे मान्य का करत नाहीत, “ राज यांनी सवाल उपस्थित केला.