ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतीच घोषणा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली आहे. उमा भारती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. २०१६ मध्ये उमा भारती यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते. शुक्रवारी याबाबत त्यांनी निर्णय घेतला आहे.

‘उमा भारती यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पक्षासाठी काम करायचे आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे’, असे जेपी नड्डा यावेळी म्हणाले.

नवी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ जर मी लोकसभा निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानतात. २०१६ मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे, पुढील दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार आहे.

पक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी 5 मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार आहे, असे उमा भारती म्हणाल्या.