लोकसभा निवडणूक २०१९ डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसकडून सातत्याने नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. आधी गरिबांना किमान उत्पन्नाची हमी यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी कोची येथे महिला आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. जर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता आली तर महिला आरक्षण विधेयक संमत होण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल बुथस्तरीय पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. २०१९ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही सर्वांत प्रथम संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत करू. आम्ही महिलांना नेतृत्वाच्या स्तरावर पाहू इच्छितो, असे ते म्हणाले. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे. या मुद्यावर सर्वसहमती न झाल्यामुळे अजूनही हे विधेयक प्रलंबित आहे.

यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदींनी धनाढ्य लोकांना कमाल उत्पन्नाची हमी दिली आहे. तर आम्ही गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणार आहोत. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी मात्र काँग्रेसच्या या घोषणेवर टीका केली आहे. राहुल गांधींचे हे आश्वासन खोटे असून त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये दिलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणेच निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. मायावती यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेसच्या नेतृत्त्वातील आघाडीमध्ये सामील होण्यात त्यांना रस नसल्याचे स्पष्ट होत आहे.