पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जागा वाटपा संदर्भात मित्र पक्षांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये भाजपाने घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरु केली आहे. बिहारमध्ये भाजपाने जितक्या जागांवर दावा केलाय त्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून मतभेदांची दरी रुंदावण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी भाजपाला निम्म्या म्हणजे २० जागा हव्या आहेत.

बिहारमध्ये भाजपा इतकीच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडची ताकत आहे. पण सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार जेडीयूला फक्त १२ जागा देण्याचा प्रस्ताव आहे. राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला सहा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीला दोन जागा देण्याचा प्रस्ताव आहे. जेडीयूचे नेते के सी त्यागी यांनी जागा वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले. चर्चा सुरु असताना हे आकडे येतात कुठून ? असा सवाल त्यांनी केला. १२ जागा आम्हाला कधीही मान्य होणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश आणि बिहार लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव, कर्नाटकात सरकार बनवण्यात आलेले अपयश हेच कमकुवत दुवे पकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा जेडीयूचा प्रयत्न असेल. लोकसभा निवडणुकीत जेडीयूच मोठया भावाच्या भूमिकेत असेल असे त्यागी जुलै महिन्यात म्हणाले होते. ४० जागांपैकी भाजपा आणि जेडीयूने प्रत्येकी १६ जागा घ्याव्यात उर्वरित आठ जागा एलजेपी आणि आरएलएसपी पक्षासाठी सोडाव्यात असे जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

मोठा भाऊ कोण बनणार ? यावरुन सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. भाजपाने निम्म्या जागांचा आग्रह सोडला पाहिजे. भाजपाला मान्य नसेल तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू शकतो असे टीम नितीशमधील एका नेत्याने सांगितले. ही लोकसभेची निवडणूक आहे. नितीश कुमार पंतप्रधानपदासाठी दावा करणार नाहीयत. त्यामुळे भाजपाच्या तुलनेत आमच्याकडे गमावण्यासारखे फार कमी आहे असे जेडीयूचा नेता म्हणाला.