पंतप्रधान नरेंद्र मोदी आव्हानांचा सामना करण्यासाठी नेहमीच तयार असतात. काम नाही म्हणून मोदी शांत बसत नाहीत. काम नसेल तर ते काम शोधतात अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या भव्य विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणासीत आले आहेत. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे.

पंतप्रधान मोदींसारखे लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाले हे काशीचे भाग्य आहे. मोदी मणिनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले मग मुख्यमंत्री बनले. जेव्हा त्यांनी मणिनगर सोडले तेव्हा ते देशातील विकसित क्षेत्र होते. २०१४ सालची काशी आणि आताची काशी यामधला फरक तुम्हाला दिसेल. गंगेच्या घाटापासून एअरपोर्ट ते काशीतील रस्त्यांमधला फरत तुम्हाला दिसेल. सखोल अभ्यास करुन काशीचा विकास केला असे अमित शाह यांनी सांगितले.

निवडणूक निकालातून उत्तर प्रदेश भाजपाचा गड आहे हे सिद्ध झाले. पाच वर्षात उत्तर प्रदेशचा समावेश देशाच्या विकसित राज्यांमध्ये होईल असा दावा सुद्धा अमित शाह यांनी केला. देशाच्या इतिहासात असा दुर्मिळ प्रचार असेल जिथे उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर मतदारांवर विश्वास ठेऊन तो तिथे गेला नसेल. हे वाराणसीमध्ये घडले. भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना इथे प्रचारासाठी येऊ नका सांगितले. मोदींनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही तो विश्वास सार्थ ठरवला या शब्दात अमित शाह यांनी वाराणासीच्या जनतेचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींनी आव्हानाला संधीमध्ये बदलण्याची प्रेरणा दिली. लोकसभा निवडणुकीतील विजयाने ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ हे सिद्ध झाले आहे असे योगी आदित्यनाथ म्हणाले. मोदींमुळे जनतेला योजनांचा लाभ मिळाला. उत्तर प्रदेशच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन मोदींना मतदान केल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.