News Flash

पाकिस्तानातील धार्मिक हल्ल्यानंतर तीनशे जणांना अटक

अफगाणी नागरिकांची ओळखपत्रे तपासत आहेत.

| February 20, 2017 12:26 am

पाकिस्तानात सूफी धर्मस्थळाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात ८८ जण ठार झाल्यानंतर पंजाब प्रांतात तीनशे जणांना अटक करण्यात आली असून, त्यात बहुतांश अफगाणी लोक आहेत. एकूण साडेतीनशे लोकांना सोमवारच्या स्फोटानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. मॉल रोड येथे हा स्फोट झाला होता, असे पंजाब प्रांताचे प्रवक्ते नियाब हैदर यांनी सांगितले.

सुरक्षा दले हल्लेखोरांचा शोध घेत असून, अफगाणी नागरिकांची ओळखपत्रे तपासत आहेत. दक्षिण सिंध प्रांतात सेहवान भागात लाल शहाबाझ कलंदर भागात आयसिसने केलेल्या हल्ल्यात ८८ ठार, तर इतर २०० जण जखमी झाले होते. शनिवारी व रविवारी पोलिसांनी २०० जणांना अटक केली. त्यात अफगाण व पश्तून लोकांचा प्रामुख्याने समावेश आहे. ज्यांनी घरे भाडय़ाने दिली त्यांनाही अटक करण्यात आली आहे. एकूण १५ पंजाब विधानसभेवर केमिस्टच्या निदर्शनांच्या वेळी आत्मघाती स्फोटात ठार झाले होते, त्यात बहुतांश पोलिस अधिकारी होते.

सीआयडीच्या प्रवक्त्याने सांगितले, की पोलिस गुप्तचरांच्या माध्यमातून शोध घेत आहेत. संवेदनशील सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धार्मिक स्थळांच्या आसपास तपास मोहीम सुरू आहे. पोलिसांनी बायोमेट्रिक ओळखपत्रांच्या मदतीने लोकांच्या ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या स्फोटातील प्रमुख हस्तक अनवर उल हक याला घर भाडय़ाने देणाऱ्याला अटक केली आहे.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री शहाबाझ शरीफ यांनी सांगितले, की हक याने आत्मघाती बॉम्बरला मॉल रोडवर आणले होते. दहशतवाद विरोधी न्यायालयाने हक याला ३० दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. लाहोर स्फोटाची जबाबदारी तहरीक तालिबान पाकिस्तानचा फुटीर गट जमात उल अहररने स्वीकारली आहे.

पाकिस्तानने आतापर्यंत त्यांच्या देशातील दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे. पाकिस्तानात १०० संशयित दहशतवादी मारले गेल्यानंतर त्यांनी सीमेवर लपलेल्या ७६ दहशतवाद्यांची यादी अफगाणिस्तानला सादर केली आहे.

 

पंजाब प्रांतातील प्रार्थनास्थळावरील हल्ला निष्फळ; ५ दहशतवाद्यांचा खात्मा

लाहोर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सुफी पंथियांच्या एका प्रार्थनास्थळावरील भीषण हल्ल्यानंतर पंजाब प्रांतात पोलिसांनी रविवारी पाच दहशतवाद्यांना ठार करून मुलतानच्या प्रार्थनास्थळावरील एक संभाव्य दहशतवादी हल्ला हाणून पाडला. हे दहशतवादी यावर्षीच्या सुरुवातीला लाहोरमध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जमात-उल-अहरार (जेयूए) या दहशतवादी गटाचे होते, असे पंजाब पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (सीटीडी) सांगितले. लाहोर स्फोटात १५ लोक मरण पावले होते. जेयूएच्या आठ दहशतवाद्यांनी मुलतानमधील प्रार्थनास्थळावर हल्ल्याची योजना आखली असल्याची माहिती सीटीडीला मिळाली होती. लाहोरपासून २५० किलोमीटर अंतरावरील लाया जिल्ह्य़ात लपून बसलेले हे दहशतवादी रविवारी हा हल्ला करण्यासाठी त्यांचा नेता ओमर खलिद खोरासानी याच्या आदेशाची वाट पाहात होते, असे सीटीडीच्या प्रवक्त्याने सांगितले. सीटीडीच्या पथकाने या दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिल्यानंतर झालेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले. त्यांच्याजवळून ४ हातबाँब, १ रायफल व २ पिस्तुले अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गेल्या आठवडय़ात सीटीडीने जेयूएच्या ६ दहशतवाद्यांना याच प्रांतातील खानेवाल जिल्ह्य़ात ठार मारले होते.

 

चकमकीत ११ अफगाणी दहशतवादी ठार

पेशावर : पाकिस्तानच्या अशांत अशा वायव्येकडील आदिवासी भागात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अफगाणिस्तानचे किमान ११ दहशतवादी ठार झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. कुर्रम क्षेत्रातील सपेरकोट व पारा चमकानी येथे ही चकमक झाली. काही दहशतवादी अफगाणिस्तानातून खैबर खिंडीच्या मार्गाने कुर्रम भागात प्रवेशाचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांनी त्यांना अडवले. यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार गोळीबार केला. यात ११ अफगाणी दहशतवादी ठार झाले, तर अनेक जखमी झाले. किमान दोन सैनिकही यावेळी जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांचे मृतदेह राजकीय अधिकाऱ्यांकडे सोपवले जातील, असे सुरक्षा दलांनी म्हटले आहे. आयसिसच्या एका दहशतवाद्याने सिंध प्रांतातील एका सुफी प्रार्थनास्थळावर आत्मघातकी बॉम्बहल्ला करून ८८ जणांचे बळी घेतल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध व्यापक कारवाई सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 12:26 am

Web Title: loksatta crime news 10
Next Stories
1 VIDEO: …जेव्हा हजारो फूट उंचीवर जेट एअरवेजच्या विमानाचा संपर्क तुटतो
2 रमजान-दिवाळीचा उल्लेख मतांच्या ध्रुवीकरणासाठी?
3 रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आयकरातून सूट
Just Now!
X