सहकाऱ्यांकडून दहशतवादी, तालिबान अशी होणारी संभावना आणि काही सहकाऱ्यांनी डोक्यावरील स्कार्फ फाडण्याचा केलेला प्रयत्न याचा उबग आल्याने एका ३८ वर्षीय बुरखाधारी महिला पोलीस अधिकाऱ्याने न्यू यॉर्क पोलीस विभागाविरुद्ध (एनवायपीडी) फिर्याद दाखल केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

सदर महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव डॅनिएला आलमराणी असे असून ती २००६ मध्ये न्यू यॉर्क पोलीस विभागांत आली आणि वर्षभरातच तिने इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर तिने बुरखा परिधान करण्यास सुरुवात केल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली आणि छळ करण्यास सुरुवात करण्यात आली, असे याचिकेत म्हटले आहे. बुरखा घालून कामावर हजर होताच आलमराणी हिच्या सहकाऱ्यांनी तिला दहशतवादी, तालिबान असे संबोधले, तू पोलीस अधिकारी होऊ शकत नाहीस, असेही तिला सांगण्यात आल्याचे मॅनहटनच्या फेडरल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.

त्यानंतर २०१२ मध्ये तिच्यावर शारीरिक हल्ला करण्यात आला आणि स्थिती अधिकच चिघळली. दोन अधिकाऱ्यांनी तिच्या डोक्यावरील बुरखा खेचण्याचा प्रयत्न केला, असे न्यू यॉर्क पोस्टने याचिकेचा हवाला देत म्हटले आहे. काही अधिकाऱ्यांनी तिला लाखोली वाहिली आणि ठोसा मारण्याची धमकीही दिली.

आपला छळ करण्यात आल्याचा समाजमाध्यमांवरील पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा आलमराणी हिने केला आहे. याबाबत आपण नुकसानभरपाईची मागणी करणार आहोत, असे आलमराणी यांनी सांगितले.