काही दशकांपूर्वी काँग्रेसने ज्याचा पाया रचला तीच आरोग्य यंत्रणा आज महामारीविरुद्धच्या लढ्यात शस्त्र म्हणून समोर आल्याचं मत अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. तसेच काँग्रेसच्या मुल्यांंनीच आज देशाला तरालं आहे, असं मतही अमित यांनी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना व्यक्त केलं.

मागील सात आठ वर्षात निधर्मी, पुरोगामी, सहिष्णु असं हे जणू काही दुर्गूण आहेत असं वातावरण तयार झालं आहे. ही जुनी मुल्य काँग्रेस पुढे घेऊन जाणार का?, असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना अमित यांनी काँग्रेसच्या मुल्यांच्या आधारे आज देशात उभारलेली व्यवस्था करोना संकटाच्या काळातही उपयोगी पडल्याचा दाखला दिला. “आज देशात जे सुरुय ते पाहता काँग्रेस पक्षाची मुल्ये देशाला तारतायत असं म्हणता येईल. ज्या अपेक्षेने काही वर्षांपूर्वी राजकीय परिवर्तन झालं त्याचं फलित काय आहे याचा विचार केला तर लोकांनाही आपण जे निर्णय घेतले त्याबद्दल प्रश्न पडलाय. जे परिवर्तन झालं ते दिसत आहे. देशाने काय मिळवलं काय गमवलं हे आपण पाहतोय. कोणत्या आश्वासनांची पूर्तता झाली? देशातील राजकीय अवस्थेवर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये भाष्य होत आहे. देशाचा नागरिक म्हणून आपल्याला हे बोध घ्यायला लावणार आहे. काँग्रेस पक्षानं या देशाचा लोकशाहीचा पाया रचला आज त्याच पायानं देशाला तारलं असं म्हटलं जात आहे,” असं अमित यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख

नक्की वाचा >> भविष्यात काँग्रेसला महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ येणार; अमित देशमुखांनी व्यक्त केला विश्वास

करोना महामारीतही काही दशकांपूर्वी काँग्रेसने ज्याचा पाया रचला तीच आरोग्य यंत्रणा आज महामारीविरुद्धच्या लढ्यात शस्त्र म्हणून कामी आलीय, असं सांगताना अमित देशमुख यांनी एम्सपासून अनेक वैद्यकीय संस्थांचं उदाहरण दिलं. काही देशांना लसींचं उत्पादन करता येतं त्यापैकी भारत देश आहे. महाराष्ट्रात या लसीचं उत्पादन घेतलं जातं. आज ही लस जगभरात पुरवली जाते. हा जो पाया रचला विज्ञानाचा, संशोधनाचा, लोकशाही ही जी यंत्रणा काँग्रेसच्या विचारसणीला सुसंगत आहे त्याचा फायदा झाला. विकास आधुनिकता परिवर्तन, सर्व धर्मसमभाव याचा समावेश असेलेली व्यवस्था फायद्याची ठरेल हे सिद्ध झाल्याचं अमित देखमुख यांनी म्हटलं आहे.