मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन आज(दि.26) 20 दिवस उलटले आहेत. काश्मीरमधून अनेक निर्बंध हटवण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसंच तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचा दावा देखील केंद्राने केलाय. पण, अशातच शनिवारी (दि.24) राज्यपालांच्या निमंत्रणाचा धागा पकडून राहुल गांधींच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल झालं होतं. मात्र, विरोधकांच्या शिष्टमंडळाला विमानतळावरच रोखण्यात आले. शहरात जाण्याची त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि जवळपास तीन तासांमध्येच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांची विमानतळावरूनच दिल्लीला परतपाठवणी करण्यात आली.

त्यानंतर विरोधकांना परिस्थितीची पाहणी करु दिली जात नाहीये, मोदी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय? असा सवाल काँग्रेसने केला आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमधील परिस्थिती भयावह असून तेथील लोकांच्या समस्या ऐकून दगडालाही अश्रू आवरता येणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली. तर राहुल गांधी यांनी काश्मिरमध्ये परिस्थिती सामान्य नाहीये, काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला,असा आरोप केला होता. त्यानंतर विमान प्रवासात राहुल गांधींसमोर कैफियत मांडणाऱ्या एका काश्मिरी महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर विरोधकांकडून काश्मीर विषयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये फोन आणि इंटरनेट सेवा हळूहळू सुरू होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे असा दावा सरकारचा आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपानंतर सोशल मीडियावर काश्मीरबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी राहुल गांधींच्या आरोपात तथ्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळत आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचं म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ वाचकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून करत आहे. ‘काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाहीये’, या राहुल गांधींनी केलेल्या आरोपात तथ्य आहे असे वाटते का? या प्रश्नावर वाचक फेसबुक तसेच ट्विटरवर आपले मत नोंदवू शकतात.