लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने प्रियंका गांधी यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती केली आली आहे. काँग्रेसची ही मोठी राजकीय खेळी असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षातील कार्यकर्ते प्रियंका यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी करत होते. आता प्रियंका यांना औपचारिकरित्या पक्षात पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळामध्ये प्रियंका आणि राहुल यांची जोडी मोदी आणि शाह यांच्या जोडगोळीला टक्कर देऊ शकेल का याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ फेसबुक आणि ट्विटवर एक जनमत चाचणी घेत आहे.

‘प्रियंका-राहुल गांधी यांची जोडी मोदी-शाह यांच्या जोडीला टक्कर देईल असं वाटतं का?’ या प्रश्नाचे उत्तर वाचक ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर तसेच ट्विटर अकाऊण्टवर उद्या (२४ जानेवारी) दुपारी दीड वाजेपर्यंत देऊ शकतात.

ट्विटवर मत नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा


तर फेसबुकवर मत नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षात पद दिले आहे. प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून फेब्रुवारीपासून त्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रियंका गांधी वडेरा यांना दिलेली जबाबदारी महत्त्वाची आहे. याचा फायदा फक्त पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत मर्यादित राहणार नाही, याचा फायदा सर्वत्र होईल, असे व्होरा यांनी सांगितले. आता आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही जोडी अमित शाह- नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यात कितपत यशस्वी होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.