केंद्रामधील मोदी सरकारच्या कामगिरीवर आम्ही समाधानी नसल्याचे मत ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या सर्वेक्षणामध्ये वाचकांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या गोष्टीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन ३० मे रोजी एक वर्ष पूर्ण झालं. याच पार्श्वभूमीवर भाजपाने सोशल नेटवर्किंगवरुन काही हॅशटॅग वापरुन मोदी सरकारने मागील सहा वर्षांमध्ये केलेल्या कामांचा पाढा वाचला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी ३० मे रोजी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत भाजपा सरकारच्या कामाचे कौतुक केलं. मात्र खरोखरच मागील एका वर्षामध्ये भाजपा सरकारच्या कामगिरीवर सामान्य जनता समाधानी आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने केला. फेसबुक तसेच ट्विटरवर घेण्यात आलेल्या या जनमत चाचणीमध्ये ३६ हजारहून अधिक वाचकांनी आपलं मत नोंदवलं. ट्विटवरील ५४.५ टक्के तर फेसबुकवरील ६३ टक्के वाचकांनी आपण केंद्र सरकारच्या कामावर समाधानी नाहीत असं मत नोंदवलं.

३० मे रोजी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनमत चाचणीच्या माध्यमातून वाचकांना एक प्रश्न विचारला होता. “मोदी 2.0 सरकारचं पहिलं वर्ष; कसं गेलं? नोंदवा तुमचं मत,” असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. यामध्ये वाचकांना, ‘समाधानी’ आणि ‘असमाधानी’ असे दोन पर्याय दिले होते. ट्विटरवर या जनमत चाचणीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ट्विटरवरील ३० हजार ६७९ वाचकांनी या जनमत चाचणीमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी. ५४.५ टक्के वाचकांनी म्हणजेच ३० हजार ६७९ पैकी १६ हजार ७२१ जणांनी ‘असमाधानी’ असं मत नोंदवत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. फेसबुकवर या जनमत चाचणीमध्ये ६ हजार ७०० जणांनी आपला सहभाग नोंदवला. येथील जनमताचा कौलही मोदी सरकारच्या कामाकाजावर असामधानी असल्याच्याच बाजूने होता. ६ हजार ७०० पैकी ४ हजार २०० म्हणजेच एकूण नोंदवण्यात आलेल्या मतांपैकी ६३ टक्के मते ही असमाधानी असल्याच्या बाजूने होती.

ट्विटरवर दोन्ही समाधानी आणि असमाधानी असं मत नोंदवणाऱ्या वाचकांची संख्या अगदी काही टक्कांनी मागे-पुढे असल्याचे दिसून आलं. आपण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये ‘समाधानी’ असल्याचे मत ४५.५ टक्के वाचकांनी नोंदवलं. म्हणजेच एकूण मत नोंदवणाऱ्या ३० हजार ६७९ पैकी १३ हजार ९५९ जणांनी ‘समाधानी’ असल्याचे मत व्यक्त केलं. तर फेसबुकवर मत नोंदवणाऱ्यांपैकी ६ हजार ७०० जणांपैकी २ हजार ४०० जणांनी मोदी सरकारच्या कामावर ‘समाधानी’ असल्याचे म्हटले आहे.

शेकडो वाचकांनी या पोलवर आपले मत नोंदवत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी तिहेरी तलाख, अयोध्या मुद्दा, कलम ३७० या गोष्टींसाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चांगले निर्णय घेतल्याचे मत नोंदवले आहेत. तर अनेकांनी अर्थव्यवस्था, लॉकडाउनंतरचे मजुरांचे झालेले हाल यासंदर्भात आपली नाराजी प्रतिक्रियांमधून व्यक्त केली आहे.