पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नारा देत भाजपाने निवडणुक प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास मोदीच्याच गळ्यात पुन्हा पंतप्रधान पदाची माळ पडणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. असे असले तरी पंतप्रधान पदाच्या नावासाठी महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांची नावेही चर्चेत आहे. पहिले नाव म्हणजे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि दुसरे नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. अर्थात काँग्रेस आणि मित्रपक्ष जिंकल्यानंतर पंतप्रधान म्हणून पवार यांचा विचार होऊ शकतो असं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. असं असलं तरी या दोन्ही नेत्यांनी आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. याच संदर्भात ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने घेतलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये मराठी वाचकांनी भावी पंतप्रधान म्हणून गडकरी आणि पवार यांच्याऐवजी मोदींना पाठिंबा दिल्याचे चित्र दिसत आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये ७ हजार ७७७ वाचकांनी आपले मत नोंदवले. या सर्वेक्षणामध्ये मोदी सरकारच्या कामांपासून ते राहुल गांधी आणि इतर तिसऱ्या नेतृत्वासंदर्भातील काही प्रश्न वाचकांना विचारण्यात आले होते. याच प्रश्नांपैकी एका प्रश्नाला उत्तर देताना मोदी की गडकरी यामध्ये वाचक गोंधळलेले दिसत आहेत. ‘मोदींपेक्षा नितीन गडकरी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे वाटते का?’ या प्रश्नाला ५०.६ टक्के म्हणजेच ३ हजार ९३६ जणांनी गडकरी हे मोदींपेक्षा अधिक योग्य उमेदवार वाटत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी २५.४ टक्के वाचकांनी मोदींऐवजी गडकरींना पसंती दिली आहे. २४ टक्के वाचकांनी मोदी की गडकरी निवडण्याऐवजी तटस्थ राहणे पसंत केले आहे. मोदींऐवजी गडकरी योग्य वाटणाऱ्या वाचकांची संख्या १ हजार ९७५ इतकी आहे तर तटस्थ राहणाऱ्यांची संख्या १ हजार ८६६ इतकी आहे. म्हणजेच एकूण ७ हजार ७७७ जणांपैकी ४९.४ टक्के वाचकांचा कौल गडकरींच्या बाजूने आहे किंवा त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात अमरावती येथील ज्योतिष परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तवली आहे. मात्र जनतेचा कल पाहता त्यांनी पंतप्रधान म्हणून गडकरींऐवजी मोदींनाच पसंती दिल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

 

नक्की वाचा >> सर्वात प्रभावशाली मंत्री म्हणून वाचकांची पसंती कोणाला? गडकरी, जेटली, स्वराज की प्रभू?

दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे मत वाचकांनी नोंदवले आहे. ‘शरद पवार पंतप्रधान होतील, असे वाटते का?’ या प्रश्नाला उत्तर देताना ६६.५ टक्के वाचकांनी ‘नक्की होणार नाहीत’ असे मत नोंदवले आहे. सर्वेक्षणामध्ये मत नोंदवणाऱ्या ७ हजार ७७७ वाचकांपैकी ५ हजार ०९७ वाचकांनी ‘नक्की होणार नाहीत’ हा पर्याय निवडला आहे. याचबरोबर २३.६ टक्के वाचकांनी म्हणजेच १ हजार ८३३ वाचकांनी पवार पंतप्रधान होण्याची ‘शक्यता खूपच कमी’ असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे केवळ २.३ टक्के म्हणजेच १८२ जणांनी पवार ‘नक्कीच (पंतप्रधान) होतील’ हा पर्याय निवडला आहे. याशिवाय ६६५ म्हणजे ८.६ टक्के वाचकांनी कदाचित पवार पंतप्रधान होतील असं मत नोंदवलं आहे.

एकीकडे गडकरींबद्दल संभ्रम तर पवारांना स्पष्ट विरोध असतानाच मोदी पंतप्रधान होण्यासंदर्भात वाचकांनी एकमताने होकारार्थी कौल दिला आहे हे विशेष. मोदी सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी असून मोदी नक्कीच पुन्हा पंतप्रधान होतील असं मत वाचकांनी नोंदवले आहे.

नक्की वाचा >> वाचक म्हणतात, ‘ फिर एक बार मोदी सरकार’

हा सर्वेक्षणामधून मोदींना जनतेचा पूर्ण पाठींबा असल्याचेच सध्या तरी दिसत आहे. ऑनलाइन सर्वेक्षणातील हाच ट्रेण्ड निवडणुकांमध्ये कायम राहिला तर मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत भाजपाने दिलेला ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नारा खरा ठरु शकतो.