सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून देशभर आंदोलन सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतही काँग्रेसने मोर्चा काढला आहे. मुंबई, कर्नाटक, बिहार आणि लखनऊ येथील सीबीआय कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आजच्या मोर्चा आधीच राहुल गांधींने राफेल करारातील घोटाळ्याबाबत चौकशी करत असल्याने सीबीआयचे संचालक आलोक वर्माना हटवण्यात आल्याचा आरोप केला होता. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला असलेल्या झालावाड येथे आयोजित एका सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा सीबीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यामागे हात असल्याचा थेट आरोप केला होता. राहुल गांधींने केलेल्या याच आरोपांसंदर्भात ‘लोकसत्ता’ने वाचकांची मते जाणून घेण्यासाठी एक जनमत चाचणी घेतली. या जनमत चाचणीमध्ये ५८ टक्के वाचकांनी राहुल गांधींच्या मताशी आपण सहत असल्याचे मत नोंदवले आहे. तीन हजारहून अधिक वाचकांनी या जनमत चाचणीमध्ये आपले मत नोंदवले.

सध्या देशभरात गाजत असलेल्या सीबीआय प्रकरणावरून राहुल गांधीनी मोदी सरकारवर केलेला आरोप योग्य वाटतो का असा सवाल केला होता. फेसबुक तसेच ट्विटवरील या जनमत चाचणीमध्ये, ‘‘राफेल’च्या भीतीमुळे नरेंद्र मोदींनी सीबीआय अधिकाऱ्यांना हटवले, हा राहुल गांधींचा आरोप पटतो का?’ हा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला. यासाठी ‘होय’ आम्ही राहुल गांधीशी सहमत आहोत आणि ‘नाही’ आम्ही राहुल गांधींशी सहमत नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते.

फेसबुकवर एकूण दोन हजार ७०० हून अधिक लोकांनी जनमत चाचणीत आपले मत नोंदवले. त्यापैकी एक हजार ६०० हून अधिक जणांनी म्हणजेच ५८ टक्के वाचकांनी आपण राहुल गांधींच्या मताशी सहमत असून राफेलच्या भीतीमुळेच नरेंद्र मोदींनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना हटवल्याचे मत नोंदवले. तर ४२ टक्के लोकांनी म्हणजेच एक हजार १०० हून अधिक जणांनी नाही असे मत नोंदवत मोदींनी राफेलला घाबरून सीबीआय अधिकाऱ्यांची बदली केली नाही असे मत नोंदवले.

तर ट्विटवरही ३८५ जणांनी या जनमत चाचणीमध्ये आपले मत नोंदवले. त्यापैकी ५८ टक्के वाचकांनी राहुल गांधींचे मत पटत असल्याचे मत मांडले तर ४२ टक्के वाचकांनी या मताशी असहमत असल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल यांनी ट्विटरद्वारेही मोदींवर निशाणा साधला होता. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल घोटाळ्याबाबतचे कागदपत्र गोळा करत होते. मात्र, त्यांना बळजबरी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. जो कोणी राफेल घोटाळ्याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न करेल त्याला हटवलं जाईल, संपवलं जाईल असा थेट संदेश मोदींनी दिला आहे. देश आणि देशाची राज्यघटना संकटात आहे. असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.