News Flash

लंडनमधील २६ वर्षीय तरुणी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, जाहीर केली उमेदवारी

"...तर २०२५ मध्ये बिहार हे देशातील सर्वात प्रगत राज्य असेल"

यंदाच्या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये प्रिया चौधरी या नावाची जोरदार चर्चा रविवारपासून सुरु झाली आहे. प्रिया चौधरी यांनी स्वत:ला “मुख्यमंत्री पदाची उमेदवार” घोषित केलं आहे. जनता दल युनायटेडचे नेते विनोद चौधरी यांची कन्या असणाऱ्या प्रिया सध्या लंडनमध्ये आहेत. मात्र त्यांनी बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहिरातीद्वारे घोषित केलं आहे.

२६ वर्षीय प्रिया या मूळच्या दरभंगा येथील असून त्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांनी रविवारी बिहारमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये स्वत:चा मोठा फोटो असणारी पानभर जाहिरात दिली आहे. अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात छापून आली आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी स्वत:ला ‘मुख्यमंत्री पदाचा उमेदवार’ असं घोषित केलं आहे. सध्या बिहारमध्ये भाजपा-जदयू आणि एलपीजीचे संयुक्त सरकार असून नितिश कुमार मुख्यमंत्री आहेत.

काय आहे जाहिरातीमध्ये

बिहारमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या या जाहिरातीमध्ये प्रिया यांनी आपल्या प्युरल्स या पक्षाची घोषणा केली आहे. “बिहारला आणखीन चांगलं मिळणं अपेक्षित आहे आणि ते शक्य आहे,” असं प्रिया यांनी या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. ‘प्युरल्स’ या पक्षाचे ‘एव्हीवन गव्हर्न्स’ असे घोष वाक्य आहे. “बिहारवर प्रेम आहे पण राजकारणाचा द्वेष करता? तर शामिल व्हा सर्वात पुढारलेल्या विचारांच्या पक्षामध्ये,” अशी ओळ पक्षाच्या नावाखाली लिहिण्यात आली आहे. पूर्ण काळ्या रंगाच्या बॅकग्राऊण्डवर छापण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये “तुम्ही शिड्या चढा आणि आम्ही सापांशी संघर्ष करु,” असं प्रिया यांनी जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. तसेच या जाहिरातीमध्ये त्यांनी स्वत:ला ‘२०२० निवडणुकीमध्ये बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार’ असंही म्हटलं आहे. “मी मुख्यमंत्री झाल्यास २०२५ पर्यंत बिहार हे देशातील सर्वात प्रगत राज्य असेल. तसेच २०३० पर्यंत युरोपातील राज्यांप्रमाणे बिहारमधील कारभार होईल,” असा विश्वास प्रिया यांनी या जाहिरातीमध्ये लिहिलेल्या खुल्या पत्रामध्ये व्यक्त केलं आहे.

 

सध्या बिहारच्या निवडणुकांची कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र प्रिया यांच्या या जाहिरातीमुळे राज्यात निवडणुकांच्या चर्चांना सुरुवात झाली असून या जाहिरातीवर संमिश्र प्रतिक्रिया बिहारमधील लोकांनी व्यक्त केल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 10:53 am

Web Title: london based woman priya choudhary declares herself cm candidate for bihar assembly polls scsg 91
Next Stories
1 गांगुलीवर संतापले क्रिकेट चाहते; यश महिला संघाचे, कौतुक जय शाहांचे
2 असं काय घडलं की तुकाराम मुंढे इतकं खळखळून हसले?
3 “…म्हणून मी व्हाइट हाऊसमधील इंटर्नसोबत ठेवले शरिरसंबंध”; अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खुलासा
Just Now!
X