भारतात सुमारे नऊ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. आज न्यायालयात प्रत्यार्पणावर सुनावणी झाली. दरम्यान विजय मल्ल्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ शकतो. अपिल करण्यासाठी विजय मल्ल्याला 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर होऊ शकतो.

न्यायालयाच्या निर्णयावर सीबीआय प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही लवकरात लवकर मल्ल्याला परत आणू याबद्दल सकारात्मक आहोत. सीबीआयचे आपलं सामर्थ्य आहे. आम्ही या प्रकरणावर खूप मेहनत घेतली आहे. प्रत्यार्पणासाठी पुरावे सादर करताना आम्हाला आत्मविश्वास होता असं म्हटलं आहे.

न्यायालयात जाण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘मी आधीही बँकांचं कर्ज फेडण्यासंबंधी बोललो होतो. कर्ज फेडण्याच्या माझ्या वक्तव्याचं प्रत्यार्पणाशी काही देणं घेणं नाही’, असं म्हटलं होतं. आपण कर्ज फेडण्याची दाखवलेली तयारी बनावट नव्हती असंही तो म्हणाला होता.

मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे, मी मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने आधी म्हटले होते. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने केला होता.

दरम्यान भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर विजय मल्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. यासाठी कारागृहात पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं आहे. विजय मल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आलं होतं. आर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. 1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे.

बराक क्रमांक 12 मध्ये तीन खोल्या असून यामधील एकामध्ये शीन बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला ठेवण्यात आलं आहे. तर तिसरा तुरुंग सध्या स्टोअर रुम म्हणून वापरला जात आहे.

विजय मल्याला ठेवण्यात येणारी जागा सामान्य कैद्यांपासून दूर असणार आहे. सामान्य कैदी आणि त्याच्यात एक मोठी सुरक्षा भिंत असणार आहे. या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरे असून, पोलिसांचा सतत पहारा असतो. कसाबच्या सुरक्षेसाठी बराक क्रमांक 12 ला आग आणि बॉम्बपासून सुरक्षित करण्यात आलं होतं. पहिल्या माळ्यावर जिथे कसाबला ठेवण्यात आलं होतं तिथे सध्या 26-11 चा हॅण्डलर अबु जिंदालला ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत अजूनही काही कैदी आहेत.

विजय मल्या हाय प्रोफाइल आहे या एकमेव कारणासाठी बराक क्रमांक 12 ची निवड करण्यात आलेली नाही, तर जवळच डॉक्टरांची सुविधा उपलब्ध असल्याने ही निव़ड करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 100 मीटर अंतरावर जेलमधील दवाखाना असून तिथे तीन डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असतात. 50 मीटर अंतरावरच अंडा सेल आहे जिथे मोठ्या गुन्हेगारांना ठेवलं जातं. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कास्कर आणि गँगस्टर अबू सालेम यांनाही एकदा येथे ठेवण्यात आलं होतं.

2 मार्च २०१७ला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली – लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती..