News Flash

ब्रिटन पार्लमेंटवरील हल्लेखोराची ओळख पटली

आणखी दोघांना अटक

| March 25, 2017 01:06 am

आणखी दोघांना अटक

ब्रिटन पार्लमेंटवर झालेल्या कार हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली आहे.  आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या नऊवर पोहोचली असून एका महिलेला चौकशी करून जामिनावर सोडण्यात आले आहे.

दरम्यान, हल्ला करणाऱ्याची ओळख पटली असून त्याचे नाव खालिद मसूद असे आहे. त्याची अधिकाधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून हल्ल्यात तो एकटाच होता की अन्य कोणाचा हात होता याचा तपास केला जात आहे.  मसूदचा जन्म श्वेतवर्णीय माता आणि कृष्णवर्णीय पित्याच्या पोटी झाला होता. त्याला लहानपणी वंशभेदाचा सामना करावा लागला होता. त्याचा जन्म केंट परगण्यातील डार्टफर्ड येथे झाला होता. तसेच तो ससेक्स भागातही राहिला होता. पोलिसांना यापूर्वीही त्याची माहिती होती. नोव्हेंबर १९८३ आणि डिसेंबर २००३ मध्ये त्याच्यावर अन्य दोन गुन्ह्य़ांत कारवाई झाली होती. त्याचे मूळ नाव अ‍ॅड्रियन रसेल अजाओ असे होते आणि त्यानंतर त्याने अ‍ॅड्रिय़न एम्स व अन्य नावे धारण केली होती. त्याने इस्लामचा स्वीकार केला होता.

पोलिसांनी आतापर्यंत १६ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात आणखी पाच ठिकाणांची भर पडली आहे. त्यात २७०० वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. छाप्यांमधून पोलिसांच्या हाती मोठय़ा प्रमाणात संगणकीकृत माहिती पडली आहे. तिचेही विश्लेषण सुरू आहे.  दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या चारवर पोहोचली आहे. गुरुवारी रात्री मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव लेस्ली ऱ्होड्स असे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:06 am

Web Title: london parliament attack two arrested
Next Stories
1 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत निवडणूक आयोगास नोटीस
2 योगी आदित्यनाथ यांच्याकडून हिंदूंसंबंधी प्रश्नांना प्राधान्य
3 ‘वाघ-सिंह मांस नाही खाणार तर काय पालक पनीर खातील का?’
Just Now!
X