ब्रिटनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र आता यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये वाढणारी करोना रुग्णांची संख्या ही नवीन प्रकारच्या करोना विषाणूमुळे आहे. करोनाच्या या नव्या विषाणूमुळेच ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये पुन्हा करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याचे सांगितले जात आहे. हा करोनाचा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा वेगळा असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बुधवारपासून लॉकडाउनचे कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हैंकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदारांना दिलेल्या माहितीमध्ये या नव्या विषाणूमुळे अवघ्या सात दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे तातडीने आणि अत्यंत महत्वाचे कठोर निर्णय घेणं गरजेचे असल्याचं सांगत लॉकडाउनच्या नवीन निर्बंधांची घोषणा मॅट यांनी केली. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तिसऱ्या स्तरावरील लॉकडाउनचे निर्बंध लावण्यात येणार आहेत. म्हणजेच या भागांमध्ये जवळजवळ सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात येणार आहेत. “ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन प्रकार आढळून आहे. इंग्लंडच्या आग्नेय भागामध्ये रुग्णसंख्या वाढीमध्ये हेच मुख्य कारण असल्याची शक्यता आहे,” असंही मॅट म्हणाले आहेत. अशाप्रकारच्या नवीन करोना विषाणूचा संसर्ग झालेले एक हजार रुग्ण आढळून आलेत असंही मॅट यांनी स्पष्ट केलं.

लसीकरणाला सुरुवात

ब्रिटनमध्ये आरोग्य केंद्रांवर सोमवारपासून फाइजर/बायोएनटेकच्या करोना लसींचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. याच आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. सर्वाआधी वयस्कर व्यक्ती त्यानंतर पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना ही लस देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेने (एनएचएसने) दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये शंभरहून अधिक केंद्रांवर करोनाच्या लसींचा पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी सोमवारीच करोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी लसीकरणाला आजपासून (१५ डिसेंबर २०२० पासून) सुरुवात होणार आहे.

एनएचएसच्या प्राथमिक आरोग्य निरिक्षण निर्देशक असणाऱ्या डॉ. निक्की कनानी यांनी, “डॉक्टर, नर्स, औषध विक्रेते आणि अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी करोनावरील लसी देण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत,” असं सांगितलं. एनएचएसच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे, असंही कनानी म्हणाल्या.