श्रीनगर : दोन तास रांगेत.. नंतर फोन हातात दिला जातो, केवळ दोन मिनिटे नातेवाईकांशी बोलणे, मग रांगेतील पुढचा माणूस.. निराशेचा व अन्यायाचा कळस.

काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर आता मोबाइलसह दूरसंचार यंत्रणा बंद करण्यात आल्या असून सार्वजनिक पातळीवर अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपायुक्तांच्या कार्यालयांसमोर दूरध्वनी करण्यासाठी लोक तिष्ठत उभे आहेत. राज्यातील इंटरनेट व दूरध्वनी सेवा बंद करण्यात आल्याने ही वेळ आली आहे. कलम ३७० रद्द करा नाही तर काही करा पण संपर्क यंत्रणा सुरू करा अशी लोकांची भावना आहे.

दोन मिनिटांच्या संभाषणात जे सांगायचे तेच विसरून गेल्याची उदाहरणे कमी नाहीत, त्यामुळे शब्द घरंगळत आहेत. दोन-तीन मिनिटात व्यक्त होणे अवघड आहे.

कलम ३७० रद्द केल्यानंतर पाच ऑगस्टपासून दूरसंचार यंत्रणा बंद करण्यात आल्याने तेथे पत्रकारांना काम करणेही अवघड आहे. आज आठ दिवस उलटून गेले तरी तेथे इंटरनेट व फोनसेवा सुरू झालेली नाही.

मारुफा भट यांनी सांगितले की, दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर फोन करण्याची संधी मिळाली. उपायुक्त कार्यालयात ही सुविधा आहे. पण मी दिल्लीतील बहिणीशी बोलूच शकले नाही कारण हुंदके अनावर होत होते. त्यामुळे बोलणे तर बाजूलाच राहिले. तू ठीक आहेस का एवढे बहिणाला विचारले आणि अश्रूंच्या महापुरात अनेक शब्द गोठून गेले. वडिलांवर दिल्लीत बायपास शस्त्रक्रिया झाली. नंतर आम्ही परत आलो आता औषधे संपली आहेत त्यामुळे दिल्लीत बहिणीला फोन केला होता.

कुटुंबातील मृत्यू, रोजचे व्यवहार, परीक्षा अशा अनेक गोष्टीत तातडीचा संपर्क हवा असतो पण तूर्त तरी सगळे निर्बंधच आहेत.

महंमद अशरफ यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मुलगा हमास याला फोन केला होता. नातेवाईक त्यांच्याभोवती जमले होते त्यांनी पाणी दिले. हमासचे आजोबा पाच दिवसांपूर्वीच मरण पावले. मंगळवारी त्यांना ही बातमी नातवाला देता आली.

काश्मीरमध्ये ८७ टक्के लोकांकडे मोबाइल आहेत. आता संचारबंदी सारखी स्थिती लागोपाठ नवव्या दिवशी सुरू आहे. मोबाइल व दूरध्वनीही बंद आहेत.

राज्यात परिस्थिती सुरळीत नाही त्यामुळे लुधियानातील पुरवठादारास लियाकत शहा यांनी माल पाठवू नकोस असे फोनवर सांगितले पण हे सांगण्यासाठी त्यांना काही दिवस वाट पाहावी लागली.

मोबाइल इंटरनेट व फोनवरू न अफवा पसरवल्या जातात त्यामुळ ेदूरसंचार व्यवस्था बंद ठेवली आहे. अलीकडे एका आंतरराष्ट्रीय वाहिनीने शहरात गोळीबार झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात एक गोळीही सुटली नव्हती. जर मोबाइल सेवा चालू असती तर ही बातमी पसरली असती असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सार्वजनिक दूरध्वनी बूथ

राज्य प्रशासनाने नागरिकांसाठी ३०० सार्वजनिक टेलिफोन बूथची व्यवस्था करून दिली आहे, पण लोकांना त्याची फारशी माहिती नाही.

अरसालन वाणी याला काकांना त्याचा नेट परीक्षेचा अर्ज भरण्यास सांगायचे होते पण ते अजून जमलेले नाही. तो म्हणाला, मोबाइलची रिंग केव्हा सुरू होते याची आतुरतेने वाट पाहात आहे.