भारतात आता उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे  विषाणूंची संख्या कमी होऊ शकते; पण हा विषाणू बराच काळ राहणार आहे. त्यामुळे संसर्ग कमी करण्यासाठी प्रदीर्घ काळ देश बंद ठेवणे परवडणारे नाही, असे मत अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे माजी संचालक डॉ. मार्क अ‍ॅलेन विडोसन यांनी व्यक्त  केले आहे. त्यांनी सांगितले की, सध्या जगातील एक पंचमांश लोक र्निबधाखाली आहेत. त्यात भारताचाही समावेश आहे. पण संपूर्ण देशभरात टाळेबंदी लागू करण्याच्या या उपायांचा परिणाम वेगवेगळ्या भागात वेगवेगळा होईल. समशीतोष्ण प्रदेशात विषाणूचा प्रसार आणखी काही महिने वेगात होईल. उष्णकटीबंधीय देशात तो वर्षभर होईल, युरोपात बरेच देश बंद आहेत. त्यात उन्हाळ्यापर्यंत संसर्ग कमी करण्याचा हेतू आहे. भारतात हा विषाणू वर्षभर राहण्याची शक्यता असल्याने किती काळ देश बंद ठेवणार हा प्रश्न आहे.

परिणामकारक औषध अद्याप नाही

करोनाचा आजार हा सौम्य लक्षणे दाखवणारा असून  जे लोक साठीच्या पुढचे आहेत त्यांना धोका आहे. यात प्रभावी उपाय कोणता असे विचारले असता त्यांनी सांगितले की, अनेक रुग्णांत लक्षणे सौम्य असून तो फुफ्फुसात पोहोचलेला नाही. घशापर्यंतच  त्याचा संसर्ग आहे. जेव्हा तो आतील उतींना स्पर्श करतो तेव्हा फुफ्फुसांमध्ये दाह होतो. त्यामुळे श्वास घेणे कठीण होते. परिणामी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा वापर करावा लागतो. अनेक औषधांवर प्रयोग सुरू आहेत. पण अजून परिणामकारक औषध सापडलेले नाही.

उन्हाळ्यामुळे विषाणूचे प्रमाण कमी?

भारतात उन्हाळ्यामुळे या विषाणूचा प्रसार होईल का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, हा विषाणू प्रयोगशाळेत विविध  पृष्ठभागांवर जास्त काळ टिकताना दिसला आहे. उन्हाळ्यामुळे त्याचे प्रमाण कमी होईल. विषाणू कमी झाल्याने फार फरक पडेल असे नाही. कारण दारांचे हँडल व इतर ठिकाणी नेहमीच लोक हात लावत असतात ते साफ करावे लागतील. जेव्हा पन्नास टक्के लोक विषाणूला सामोरे जातील तेव्हा समुदायाची प्रतिकारशक्ती निर्माण होईल. संसर्ग वाढून कालांतराने प्रतिकारशक्ती तयार होत असते त्यामुळे नंतर इतरांनाही तो विषाणू संसर्ग करण्याची शक्यता कमी होईल.’

ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या सुविधा आवश्यक

भारतातील चाचण्यांची संख्या पुरेशी आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, भारतात काही भागात करोना विषाणूची लागण जास्त आहे. यात चाचण्या किती केल्या जातात यावर बरेच काही अवलंबून आहे कारण चाचण्या केल्याने प्रसार समजतो व पुढील व्यक्तींमध्ये संसर्ग टाळता येऊ शकतो पण त्याच्या जोडीला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या सुविधा करणे आवश्यक आहेत.

१८ महिन्यांत लस?

जागतिक साथ ही प्रादेशिक साथीत रूपांतरित होईल अशी आशा आहे. जगात  पुढील दोन वर्षांत अनेकांना या विषाणूला सामोरे जावे लागेल. शिवाय १८ महिन्यांत त्यावर लसही तयार होईल. भारतीय कंपन्या लस तयार करून जागतिक अडथळे दूर करू शकतात पण तरी विषाणू जाणार नाही, असे डॉ. मार्क अ‍ॅलेन विडोसन यांनी सांगितले.