“माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही” या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना काय भूमिका घेते? त्याकडे भाजपा नेत्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसने शनिवारी भारत बचाव रॅली आयोजित केली होती. यावेळी बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’च्या वक्तव्यासाठी माफी मागण्यास नकार दिला.

माफी मागण्याच्या मुद्दावर त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे नाव घेतले. “मी राहुल सावरकर नाही, त्यामुळे सत्य बोलण्यासाठी मी माफी मागणार नाही” असे राहुल गांधी म्हणाले. सावरकरांच्या विषयावर शिवसेना नेहमीच आक्रमक राहिली आहे. सावरकरांवर टीका करणाऱ्यांचा शिवसेनेने नेहमीच समाचार घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान न राखल्याबद्दल शिवसेनेने काँग्रेसवर आतापर्यंत बरीच टीका केली आहे.

पण तीच शिवसेना आता महाराष्ट्रात काँग्रेससोबत सरकारमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसला दुखावणारी भूमिका घेणार का? हा प्रश्न आहे. ‘वीर सावरकरांना भित्रे ठरवणाऱ्या राहुल गांधींचा शिवसेना कसा बचाव करते ते पाहायचे आहे’ असे टि्वट अमित मालवीय यांनी केले आहे. ते भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी ते परस्परांचे वैचारीक विरोधक आहेत. आज राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या विधानानंतर हा वैचारीक विरोधाभास स्पष्ट झाला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. जनादेशही महायुतीला मिळाला होता. पण निकालानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन सरकार बनवले. त्यामुळे मोठा पक्ष असूनही भाजपाला विरोधात बसावे लागले.