भगवान हनुमान हे जगातील पहिले आदिवासी होते. आदिवासींमध्ये हनुमानाला जास्त पुजले जाते. त्यांनी आदिवासींना एकत्र करुन वानरसेना बनवली होती. या वानरसेनेला स्वतः भगवान रामाने प्रशिक्षण दिले होते, असा दावा राजस्थानातील अलवर येथील भाजपा आमदार ज्ञान देव आहुजा यांनी केला आहे. दलित संघटनांनी केलेल्या भारत बंद आंदोलनादरम्यान हनुमानाच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला होता, याचा व्हिडिओ पाहून आपल्याला खुपच दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.


आहुजा म्हणाले, या पृथ्वीवरील पहिले आदिवसी नेता हनुमान होते. देशात सर्वात जास्त मंदिरेही हुनामानाची आहेत. आपल्याला त्यांचा आदर करायला हवा. भाजपा खासदार किरोडिलाल मीणा हे आदिवासी असतानाही ते हनुमानाचा सन्मान करीत नाहीत, याची त्यांना लाज वाटायला हवी, असे आहुजा यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

आहुजा यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी दावा केला होता की, दिल्लीच्या जवाहरलाल युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) परिसरात रोज ३ हजार कंडोम आणि २ हजार दारुच्या बाटल्या आढळून येतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आहुजा म्हणाले होते की, जे लोक गोहत्या आणि गोतस्करीमध्ये सहभागी असतात त्यांनाही जनावरांसारखे मारुन टाकायला हवे.