ओरिसात जगन्नाथाची रथयात्रा १० जुलैला होत असून त्या वेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. ही रथयात्रा आता फेसबुकवरही अवतरली असून त्याचे एक खास पानच फेसबुकवर तयार केले आहे. जगन्नाथाच्या रथयात्रेची ही परंपरा जुनी आहे. जगन्नाथाचे मंदिर चारशे वर्षांपूर्वीचे असून आताची रथयात्रा ही १३६ वी आहे.
जगन्नाथ मंदिराच्या वेबसाइटवर फेसबुक पेजची लिंक असून तेथून फेसबुक पेजवर जाता येते. या पानावर जगन्नाथ मंदिराचे छायाचित्र असून तेथे भक्तगणांना ऑनलाइन भक्ती करण्याचा मार्ग खुला आहे, असे स्थानिक धर्मगुरूंनी सांगितले.
रथयात्रेत १८ सजवलेले हत्ती, १०१ ट्रक सहभागी केले जाणार असून अतिशय परिश्रमपूर्वक रथयात्रेची तयारी करण्यात आली आहे. एकूण ३८ आखाडे यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतील. जुन्या पंरपरेनुसार हत्तींना पहिल्यांदा जगन्नाथाचे दर्शन दिले जाते व नंतर शहराच्या विविध भागातून रथयात्रा नेली जाते.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या रथांची प्रतीकात्मक स्वच्छता करणार आहेत. ते रथयात्रेच्या मार्गाचीही प्रतीकात्मक स्वच्छता करणार आहेत. रथयात्रेचा मार्ग १४ कि.मी असून शहरातील काळपूर, प्रेम दरवाजा, दिल्ली चकला, दर्यापूर व शाहपूर या संवेदनशील ठिकाणांवरून ही रथयात्रा जाणार आहे.
बुधवारी जगन्नाथाची रथयात्रा सकाळी जमालपूर येथील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होईल. लाखो भाविक त्यात सहभागी होणार असून सायंकाळी ही रथयात्रा परत मंदिराकडे येईल, असे विश्वस्त महेंद्र झा यांनी सांगितले.