इराकमध्ये भगवान राम व त्यांच्या पायाशी बसलेले हनुमान दिसत असलेले भित्तीचित्र सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताचं एक प्रतिनिधीमंडळ यावर्षी जून महिन्यात इराकमध्ये गेलं होतं, येथे त्यांना जवळपास इ.स.पू 2000 मध्ये डोंगरावरील कड्यांवर कोरण्यात आलेली लेणी आढळली आहेत. एक राजा यात दिसत असून त्याच्या पायाशी नमन अवस्थेत वानर दिसत आहे. अयोध्या शोध संस्थेने ही लेणी किंवा दगडात कोरलेली शिल्पे भगवान रामाचीच असल्याचा दावा केला आहे. मात्र इराकमधील पुरातत्वखात्यानं व इतिहासकारांनी याला पुष्टी दिलेली नाही.

( छायाचित्र सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया )

‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही लेणी दरबंद-ई-बेलुला या ठिकाणाच्या एका डोंगराळ भागात दगडावर आढळली आहेत. हा परिसर इराकच्या होरेन शेखान क्षेत्राजवळ आहे. या लेण्यात धनुष्य हाती घेतलेल्या कमरेवर वस्त्र नसलेल्या एक राजा दिसत आहे. त्याच्यासमोर हात जोडलेल्या स्थितीत बसलेल्या वानराचं एक दुसरं लेणं असून ते हनुमानाचं असल्याचा दावा अयोध्या शोध संस्थानच्या योगेंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे. तर, प्राचीन काळातल्या आदिवासींच्या प्रमुखाचं म्हणजे टार्डुनी यांचं हे लेणं असल्याची इराकी अधिकाऱ्यांची अधिकृत माहिती आहे.

(छायाचित्र सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया )

इराकला गेलं होतं प्रतिनिधीमंडळ –
भारतीय राजदूत प्रदीप सिंह राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ जूनमध्ये इराकमध्ये गेलं होतं. यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागांतर्गत येणाऱ्या अयोध्या शोध संस्थानने विनंती केली होती. एब्रिल वाणिज्य दूतावासातील भारतीय अधिकारी चंद्रमौली कर्ण, सुलेमानिया विश्वविद्यालयाचे इतिहासकार आणि कुर्दिस्तानचे इराकी गव्हर्नर देखील या अभियानात सहभागी झाले होते.

पुरावे –
प्रभू राम केवळ कथांमध्ये नाही तर खरंच अस्तित्वात होते, दरबंद-ई-बेलुला येथे मिळालेले सदर निषाण हे त्याचंच प्रमाण आहे असा दावा अयोध्या शोध संस्थेच्या योगेंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे. भारतीय आणि मेसोपोटेमिया यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी भारतीय प्रतिनिधीमंडळाने ही चित्रं बरोबर आणली आहेत. “या चित्रांमध्ये दिसणारा राजा आणि वानर म्हणजे अनुक्रमे प्रभू राम आणि हनुमान आहेत. मात्र इराकमधील पुरातत्वविभागाचे अधिकारी आणि इतिहासकार याला भगवान रामाशी जोडून पाहत नाहीत. हे सिद्ध करण्यासाठी भारतीय व मेसोपोटेमियन संस्कृतीमधला गायब झालेला दुवा शोधावा लागेल. आम्ही याबाबत अधिक संशोधन करता यावं यासाठी इराक सरकारकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर मिळालेले पुरावे जोडून अभ्यास केला जाईल. सिंधू नदीच्या प्रदेशातील आणि मेसोपोटामिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध शोधण्याचा हा पहिलाच अधिकृत प्रयत्न होता”, अशी प्रतिक्रिया सिंह यांनी दिली. विविध संदर्भ देताना सिंह म्हणाले की, मेसोपोटामियावर इ.स.पू 4500 ते इ.स.पू. 1900 या कालावधीत सुमेरीयन साम्राज्य होतं. सुमेरियन भारतातून सध्याच्या इराकमध्ये पोचले आणि सिंधू प्रदेशातील संस्कृतीशी इराकशी नाळ जोडली गेली याचाच हा पुरावा आहे असा दावाही सिंह यांनी केला.

अयोध्येत ठेवणार जगभरात सापडलेले भित्तिचित्र –
उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाने इराकमधील त्या लेण्यांची प्रतिकृती मिळावी यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. श्रीरामाच्या अस्तित्वाचे दाखले जगभरात विखुरलेले असून या सगळ्यांना अयोध्येत एकाच छताखाली जतन करण्यात यावे असा आपला प्रस्ताव असल्याचे सिंह यांनी सांगितले.